scorecardresearch

नवीन केंद्रीय शाळांसाठी पालकांना प्रतीक्षा ; खास संस्थेकडून प्रतिसाद न मिळाल्याने निविदांना मुदतवाढ

महापालिका प्रशासनाने या शैक्षणिक वर्षात आणखी दोन केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळा खासगी संस्थेतर्फ चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

nmc
संग्रहित छायाचित्र

नवी मुंबई : महापालिका प्रशासनाने या शैक्षणिक वर्षात आणखी दोन केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळा खासगी संस्थेतर्फ चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी काढण्यात आलेल्या निविदांना प्रतिसाद मिळाला नसल्याने या शाळा सुरू होणार की नाही याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. प्रशासनाने आता निविदांना मुदतवाढ दिली असून १९ जुलैपर्यंत निविदा दाखल करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान नवी मुंबई महापालिकेच्या सद्यस्थितीत दोन केंद्रीय मंडळाच्या शाळा असून सीवूड्स येथील शाळा आकांक्षा फाऊंडेशनतर्फे चालविली जाते. या संस्थेने या नवीन शाळा चालवण्याबाबत रस दाखवल्याचे समजते. मात्र यावर अद्याप पालिका प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही.पालिकेच्या सीवूड्स सेक्टर ५० व कोपरखैरणे सेक्टर ११ येथे केंद्रीय मंडळाच्या दोन शाळा आहेत. सीवूडस येथील शाळा आकांक्षा फाऊंडेशनतर्फे तर कोपरखैरणे येथील शाळा पालिका स्वत: चालवते. या शाळांना दरवर्षी चांगला प्रतिसाद मिळत असून प्रतीक्षा यादी वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने या शैक्षणिक वर्षात दोन नवीन शाळांची घोषणा केली आहे. यात वाशी व कोपरखैरणे येथे या शाळा सुरू करण्याची तयारीही दाखविली आहे. मात्र या शाळा खासगी संस्थेतर्फे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबविली होती. याला संस्थांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे जूनपासून या शाळा सुरू करण्याचे पालिकेचे नियोजन बारगळले आहे.

दरम्यान या शाळांसाठी प्रवेश अर्ज प्रक्रियाही राबवण्यात आली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र शाळा चालवण्यासाठी कोणीही पुढे न आल्याने या शाळा सुरू झालेल्या नाहीत. यावर पालिका आयुक्तांनी पालकांना दिलासा देत उशिरा का होईना, पण या शाळा सुरू होतील असे आश्वसन दिलेले आहे. त्यानुसार प्रशासनाने या निविदांना मुदतवाढ दिली आहे. संस्थांकडून १९ जुलैपर्यंत निविदा सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आता या निविदांना प्रतिसाद कसा मिळतो याकडे लक्ष लागून आहे. तसेच पालकांना आणखी काही दिवस या शाळांसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पालिकेच्यावतीने नव्याने सुरू होणाऱ्या वाशी व कोपरखैरणे येथील नवीन दोन केंद्रीय मंडळांच्या शाळा सुरू करण्यावर पालिका ठाम आहे. शाळा खासगी संस्थेमार्फत चालवण्याबाबत निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे निविदांसाठी आता १९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यावेळी निविदांना प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे.- जयदीप पवार, शिक्षण उपायुक्त, महापालिका

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-06-2022 at 00:01 IST