पनवेल : पनवेल महानगरपालिकेची सर्वसाधारण महासभा बुधवारी विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा आणि निर्णयांसह पार पडली. या सभेतील पहिला सर्वाधिक चर्चेचा विषय परेश ठाकूर यांची स्थायी समितीमध्ये प्रवेश हा ठरला. ठाकूर यांच्या स्थायी समितीत प्रवेशामुळे यापुढे ठाकूर कुटुंबीयांचा प्रभाव पनवेल महापालिकेच्या प्रत्येक निर्णयात असेल.
या महासभेत शहरातील पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, स्वच्छता आणि विकासकामांशी संबंधित मुद्द्यांवर सदस्यांनी प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले, तर अनेक प्रस्तावांना मंजुरी देत आगामी कामकाजाचा मार्गही मोकळा करण्यात आला. पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.
सभेत स्थायी समिती सदस्य प्रवीण पाटील यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागी नगरसेवक परेश ठाकूर यांची नियुक्तीस मंजूरी देण्यात आली. प्रश्नोत्तरांच्या तासात शहरातील चारही प्रभागांतील पाणीटंचाईवर चर्चा झाली. न्हावा-शेवा पाणी योजनेसह अतिरिक्त टँकरची गरज यावर आयुक्त मंगेश चितळे यांनी माहिती दिली.
पुढील १० ते १५ दिवसात पनवेलमध्ये पाणी परिषद घेतली जाणार असल्याचे जाहीर केले.आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी नियुक्तीस मान्यता देण्यात आली. डायलिसिस केंद्रांसाठी प्राणवायू गॅस पुरवठ्याच्या निविदा प्रक्रियेला मंजुरी देण्यात आली. स्वच्छता व नागरी सुविधांमध्ये प्रभाग ‘ड’मधील सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्ती व नूतनीकरणास मान्यता देण्यात आली.
