• घणसोली, कोपरखैरणेत पदपथांचा वापर पार्किंगसाठी
  • घणसोली, कोपरखैरणे

शहराचा मध्यबिंदू असणाऱ्या घणसोली आणि कोपरखरणे परिसरात पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या भूखंडांवर सिडको व महानगरपालिकेतील समन्वयाच्या अभावामुळे मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. हा परिसर गावठाण भागात असल्यामुळे येथे मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभी राहिली आहेत. त्यामुळे वाहने पार्क करायची कुठे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

कोपरखरणे-घणसोली हा परिसर मूळ गावठाण लोकवस्तीचा प्रभाग आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीतील नव्या रचनेनुसार या ठिकाणी ६ प्रभाग वाढले आहेत. त्यामुळे महत्त्वपूर्ण असा कोपरखरणे प्रभाग कोंडीमुक्त करण्याचे आव्हान वाहतूक पोलीस आणि पालिकेसमोर आहे.

घणसोली गावात दाटीवाटीने वसलेल्या इमारती, आजही गावात होणारा आठवडा बाजार त्याचबरोबर महाविद्यालयांची वाढती संख्या यामुळे घणसोली परिसरात मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. सिडकोने विकसित केलेल्या घणसोली, घरोंदा कॉम्प्लेक्स परिसरात मोकळ्या भूखंडावर पार्किंग प्लाझा उभारण्याचे प्रस्तावित होते. मात्र आजही तो प्रकल्प कागदावरच आहे. घणसोली रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा थांब्यानजीक पूर्व आणि पश्चिमेकडे सिडकोचे वाहनतळ आहेत, त्यामुळे बाहेरून येणाऱ्या वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. भविष्यातील वाढती गर्दी लक्षात घेता घणसोलीत स्वतंत्र वाहनतळ बांधणे ही काळाची गरज आहे. सिडकोने घणसोली नोड नुकताच पालिकेला हस्तांतरित केला आहे. आता मात्र पालिकेने पार्किंगच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. कौपरखरणे प्रभाग हा कल्याण शिळफाटा मार्गे नवी मुंबईत प्रवेश करण्यासाठी एक महत्त्वाचा भाग आहे. मिलेनियम पार्कमार्गे कोपरखैरणे परिसरात आगमन केल्यानंतर थेट वाशी आणि घणसोलीला जाता येते. नवी मुंबई महानगरपालिकेचा आर्थिक विकासाचा स्रोत  कोपरखरणे आहे. या प्रभागातील मोकळे भूखंड सिडकोने महापालिकेकडे हस्तांतरित न केल्याने अनेक वर्षांपासून मिळेल त्या ठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा पार्किंग केले जात आहे. तेरणा महाविद्यालय, राजीव गांधी महाविद्यालय, रा. फा. नाईक विद्यालय, नवनवे मॉल यामुळे पार्किंगचा प्रश्न अधिकच गंभीर बनला आहे.

रेल्वे स्थानक परिसरात अध्र्याहून अधिक वाहनतळ अडगळीतच पडला आहे. कोपरखरणेवरून घणसोलीकडे जाण्यासाठी अंतर्गत रस्त्यांच्या दुतर्फा वाहने पार्क करण्यात येत असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

पादचारी मार्गावर अतिक्रमण

कौपरखरणे घणसोलीतील गावठाण भागांत बांधण्यात आलेल्या बहुतेक इमारतींना पार्किंगची सोय नाही. त्यामुळे पदपथांवर वाहने पार्क केली जातात. रस्त्यांवरही वाहने उभी करण्यात आल्यामुळे अनेकदा अंतर्गत भागांत मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होते.