नवी मुंबई ते जेएनपीटी मार्गावर असलेल्या उड्डाणपुलावर रात्रीच्या वेळी अवजड वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यामुळे छोट्या वाहनांना वाहतुकीस अडथळा होत असून अपघाताची शक्यता वाढली आहे. उभ्या असलेल्या या वाहनांना रात्रीच्या वेळी अंदाज येत नसल्याने इतर वाहने धडकण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई जेएनपीटी रस्त्यावर जड अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामानाने वाहनतळाची व्यवस्था नसल्याने अनेकदा रस्त्याच्या कडेला जागा मिळेल तेथे वाहन उभी केले जात आहेत. या वाहनांचे प्रमाण वाढल्याने आता उड्डाणपुलावरही ही वाहने पार्किंग केली जात आहेत. पुलाच्या ऐन उतारावर ही वाहने उभी असल्याने मागून येणाऱ्या वाहनांचा अंदाज चुकत आहे.

जुलै महिन्यात याच प्रकारातून दोन कार या वाहनांना धडकल्याच्या घटनाही घडल्या आहेत. सुदैवाने त्यात जीवितहानी वा कोणी गंभीर जखमी झाले नाही. यात वाहनांचा सर्वाधिक धोका दुचाकीस्वारांना आहे. दुचाकीच्या दिव्यांचा प्रकाश लांबपर्यंत नसल्याने त्यांना जवळ येईपर्यंत ही वाहने पुलावर उभी असल्याचा अंदाज येत नाही. अचानक वाहन उभे दिसल्यानंतर दुचाकीचालकांची पंचायत होत असल्याचे उमेश पाटील या दुचाकीस्वाराने सांगितले. पाटील हे उलवा नोडमध्ये राहतात. ते खारकोपरहून दररोज कामावरून घरी जाताना अनेकदा ही वाहने पुलावर व रस्त्यावर उभी असतात, असे त्यांनी सांगितले.

तांत्रिकदृष्ट्या बोगदा आणि उड्डाणपुलावर वाहन थांबवण्यासही मनाई आहे. अपवाद वाहन कोंडी झाली तरच. मात्र मनुष्यबळाअभावी रात्रंदिवस वाहनांवर कारवाई शक्य नाही, अशी माहिती एका वाहतूक पोलिसाने दिली.

बंदी घातल्याने प्रमाण वाढले
मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील वाहतूक कोंडी हा प्रश्न सोडवण्यासाठी अवजड वाहनांना फक्त सकाळी अकरा ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत परवानगी आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी जेएनपीटीतून येणारी ही वाहने रस्त्यावर जागोजागी थांबत आहेत. सकाळी ११ वाजण्याची प्रतीक्षा करीत असल्याने जेएनपीटी नवी मुंबई रस्त्याचे वाहनतळ झाले आहे. या वाहनांना या मार्गावर अधिकृत वाहनतळ करून तेथे उभी राहण्याची व्यवस्था करणे गरजेच होते. मात्र तसे न केल्याने हे वाहनचालकही आम्ही वाहने बंदी काळात कुठे उभी करायची असा प्रश्न उपस्थित केला आहे.

उड्डाणपुलावर वाहन पार्किंग करता येत नाही. ही गंभीर बाब असून योग्य ती कारवाई केली जाईल. – पुरुषोत्तम कराड, उपायुक्त, वाहतूक विभाग

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parking of heavy vehicles on flyovers amy
First published on: 12-08-2022 at 00:01 IST