संभाव्य गर्दीमुळे संसर्ग वाढण्याची शक्यता

नवी मुंबई : करोना रुग्णसंख्या कमी झाल्याने ठाणे जिल्ह्यतील निर्बधांत सूट देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत झाला असून नवी मुंबईतही निर्बंध हटविण्यात येणार आहेत. मात्र शहरांतील उद्याने मात्र बंदच ठेवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

नवी मुंबईत गेला महिनाभर करोना रुग्णसंख्या स्थिर आहे. शंभरपेक्षा कमी दैनंदिन रुग्ण सापडत आहेत. रुग्णदुपटीचा कालावधी आता तीन वर्षांवर गेला आहे. त्यामुळे शहरवासीयांना मोठा दिलासा आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार मंगळवारी जिल्हाधिकारी यांच्या झालेल्या बैठकीत शहरांतील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने सोमवार ते शनिवार रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. दुकाने रविवारी पूर्णत: बंद राहणार आहेत. त्याचप्रमाणे मॉल्स पूर्णत: बंद राहणार आहेत. तर शहरातील उद्याने पूर्णत: बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

शहरात महापालिकेची २०० पेक्षा अधिक उद्याने आहेत. ही उद्याने करोनाच्या पहिल्या टाळेबंदीनंतर बंदच आहेत.  मुंबई ठाणे जिल्ह्यत उद्याने व मैदाने सकाळी ५ ते ९ पर्यंत खुली ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला असला तरी नवी मुंबई महापालिकेने उद्यानांमध्ये होणाऱ्या संभाव्य गर्दीमुळे ती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी यांनी निर्बंध शिथिलता दिली असून ते नियम नवी मुंबईत लागू करण्यात आले असून फक्त उद्याने पूर्णवेळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

मंगळवारी ५१ नवे रुग्ण

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मंगळवारी ५१ नवे करोना रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील करोनाबधितांची एकूण संख्या १,०३८५१ इतकी झाली आहे तर एकूण मृतांची संख्या १८३५ पर्यंत गेली आहे. मंगळवारी ८२ जण करोनामुक्त झाले असून १०६० जण उपचाराधीन रुग्ण आहेत.