नवी मुंबई पालिकेच्या सभेत विरोधकांचा संताप
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वृक्षप्राधिकरण समितीच्या एका जागेवर नामनिर्देशन पत्राद्वारे सदस्यांची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाबाबत पक्षपाती केल्याबद्दल सर्वसाधारण सभेत विरोधकांनी संताप व्यक्त केला.
वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य नियुक्तीसाठीचा प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी तो सर्वसाधारण सभेत आणण्यात आला होता. परंतु या प्रस्तावाची माहिती विषयपत्रिकेत नसल्याने विरोधकांनी गोंधळ घातला. सचिवांनी हा प्रस्ताव आणल्याचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी स्पष्ट करत सचिव चित्रा बाविस्कर यांना त्याचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले.
त्यावेळी चित्रा बाविस्कर यांनी राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद डॉ.जयाजी नाथ यांना प्रस्तावाची माहिती दिल्याचे सांगितले. त्यावर इतर पक्षांच्या पक्ष प्रतोदांनी ही माहिती का दिली नाही, असा संतप्त सवाल करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आयुक्त आणि सचिवांना धारेवर धरले.
सात महिन्यांपासून समितीचे कामकाज सुरू आहे. मग आता समितीच्या सदस्यांची निवड करण्याचा प्रस्ताव सभेच्या मंजुरीसाठी का आणण्यात आला, असा सवाल शिवसेनेचे गटनेते द्वारकानाथ भोईर यांनी उपस्थित केला. प्रस्तावाची माहिती जाणीवपूर्वक देत नाही याचाच अर्थ यात काहीतरी गौडबंगाल आहे, असा आरोप सदस्यांनी यावेळी केला.
या मनमानी कारभाराची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचा इशारा विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी यावेळी दिला. तर सचिवांना पदावरून काढून टाकावे, अशी मागणी सदस्य एम.के.मढवी यांनी केली.