वैद्यकीय विम्याचे संपूर्ण पैसे देण्यास नकार देणाऱ्या युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला ठाणे जिल्हा अतिरिक्त ग्राहक मंचाने चांगलाच दणका दिला असून विमाकर्त्यांच्या वडिलांना रुग्णालयीन उपचारासाठी लागणारा निधी तात्काळ देण्याचे आदेश दिले आहेत. वाशीतील संदीप बुबना यांना त्यांच्या वडिलांच्या उपचारासाठी युनायटेडने पंधरा लाख रुपये दिले आहेत. विमा घेईपर्यंत ग्राहकांना अनेक प्रलोभने दाखविणाऱ्या विमा कंपन्यांना ही एक चांगली चपराक मानली जात आहे.
वाशीतील बुबना यांनी काही वर्षांपूर्वी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून पंधरा लाखांची सुपर टॉपअप मेडिकेअर पॉलिसी काढली होती. या पॉलिसीअंर्तगत त्यांनी आपल्या कुटुंबासह वडिलांचाही या विमा योजनेत समावेश केला होता. काही दिवसांपूर्वी त्यांचे वडील चालताना पडल्याने जखमी झाले. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता मायस्थेनिया ग्रावीस आजार असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे अधिक उपचारासाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय बुबना यांनी घेतला. त्या वेळी त्यांच्या या उपचारासाठी २४ लाख रुपये खर्च येईल असे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे बुबना यांनी युनायटेड विमा कंपनीकडे या उपचारातील १५ लाख रुपये मिळावेत यासाठी अर्ज केला, पण तो कंपनीने सपशेल फेटाळून लावला. त्यामुळे संतापलेल्या संदीप बुबना यांनी बेलापूर येथील अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे युनायटेडच्या विरोधात दाद मागितली. त्यावर तात्काळ सुनावणी घेऊन ग्राहक मंचाने विमाधारकांना अशा प्रकारे ऐनवेळी त्रास न देता विम्याच्या सर्व रक्कम अदा करण्याचे आदेश दिले. या लोक अदालत मंचासाठी मंचचे अध्यक्ष ए. झेड. तेलगोटे आणि सदस्य म्हणून टी. ए. थुल यांनी काम पाहिले. त्यामुळे युनायटेडला विम्याचे पंधरा लाख रुपये अदा करावे लागले आहेत. या निर्णयामुळे बुबना यांच्या वडिलांवर उपचार करणे आता शक्य झाले आहे. विविध प्रकारचे विमा घेताना ग्राहकाला अनेक प्रलोभने दाखवून विमा उतरविला जातो, पण वैद्याकीय विम्यासारख्या प्रकरणात ग्राहक दु:खात असताना त्रास देणाऱ्या विमा कंपन्यांना या एका प्रकरणामुळे चांगलीच चपराक बसली आहे.