४८ रुग्णांवर उपचार; सहा अतिदक्षता विभागात

नवी मुंबई : शहरात दिवाळीच्या काळातही करोना रुग्णांत अल्पशी घट झाल्याने उपचाराधीन रुग्णसंख्येत घट झाली आहे. मंगळवारी  शहरात २९२ उपचाराधीन रुग्ण होते. हे करोनाच्या दोन्ही लाटांतील सर्वात कमी संख्या आहे.

शहरात करोनाची पहिली लाट नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ओसरली होती, तर दुसऱ्या लाटेत ११ एप्रिल २०२१ ला ११,६०५ ही सर्वोच्च उपचाराधीन रुग्णसंख्या झाली होती.

पहिल्या लाटेत एका दिवसातील सर्वोच्च रुग्णसंख्या २० ऑगस्टला ४७७, तर दुसऱ्या लाटेत ही संख्या ४ एप्रिलला १४४१ पर्यंत गेली होती. शहरात हळूहळू करोना रुग्ण कमी झाले तसे उपचार घेणारे रुग्णही कमी झाले आहेत. शहरात उपचाराधीन रुग्णसंख्या फक्त २९२ वर आली आहे. यातील गृह अलगीकरणात १६८ रुग्ण असून प्रत्यक्षात ४८ रुग्णांवरच उपचार सुरू आहेत.

रुग्णांची संख्याही घटल्याने दिलासा मिळाला आहे; परंतु दुसरीकडे नागरिक मुखपट्टीविना फिरू लागले असल्याने रुग्णवाढीचा धोका कायम आहे. छठपूजा उत्सव नियमावली महापालिका प्रशासनाने जाहीर केली असून तलाव, नदी, समुद्रकिनारी गर्दी न करता घरीच साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे करण्यात आले आहे.

उपचाराधीन रुग्ण

  • सिडको प्रदर्शन केंद्र : ४२
  • सिडको प्रदर्शन केंद्र (अतिदक्षता) : ६
  • नेरुळ करोना केंद्र : ०३
  • गृह अलगीकरण : १६८