‘एमआयडीसी’तून कंपन्या रासायनिक पाणी सोडत असल्याचा आरोप

नवी मुंबई : गेली अनेक वर्षे बंद असलेली रासायनिक सांडपाण्याची दुर्गंधी गेल्या आठवडाभरापासून पुन्हा येऊ लागल्याने पावणे-महापेतील रहिवासी त्रस्त आहेत. येथील काही रासायनिक कंपन्या आपले सांडपाणी नाल्यात सोडत असल्याने नाल्यावर तवंग आले असून यामुळे उग्र दरुघधी येत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. याबाबत त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला माहिती दिली आहे. मात्र यावर कोणतीही कारवाई होत नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून  मात्र याबाबत कोणतीही तक्रार आली नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे.

ठाणे-बेलापूर औद्यागिक वसाहतीत मोठय़ा प्रमाणात रासायनिक कारखाने होते. हे कारखाने पूर्वी मोठय़ा प्रमाणात त्यांचे सांडपाणी नाल्यात सोडून देत असत. हे सांडपाणी समुद्रात मिसळत असे. यामुळे मोठय़ा प्रमाणात नाले प्रदूषित होत असत व त्या परिसरात मोठी दुर्गंधी पसरत असे. मात्र गेल्या दशकभरात अनेक रासायनिक कारखाने बंद झाले असून त्या जागेवर आयटी वा अन्य कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे या प्रदूषण वा दुर्गंधीपासून नागरिकांना दिलासा मिळाला होता.

मात्र गेल्या आठवडाभरापासून असाच प्रकार सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. अस्तित्वात असलेल्या काही रासायनिक कंपन्या टाकाऊ  रासायनिक द्रवपदार्थ प्रक्रिया न करता थेट नाल्यात सोडत आहेत. त्यामुळे पावणे, महापे परिसरात रात्री मोठय़ा प्रमाणात दरुघधी येत आहे. अनेकदा ही दुर्गंधी कोपरखैरणे, घणसोली बोनकोडेपर्यंत पसरत आहे. रासायनिक सांडपाणी बिनदिक्कत थेट नाल्यात सोडले जाते. हे नाले बोनकोडे, घणसोली परिसरातील नाल्यातून पुढे खाडीला मिळतात. त्यामुळे त्या त्या परिसरात ही दुर्गंधी येत असल्याची माहिती बोनकोडेतील ग्रामस्थ प्रदीप म्हात्रे यांनी दिली. तर पावणे येथील रहिवासी प्रफुल्ल मुकादम यांनी सांगितले की, अनेक दिवसांपासून बंद झालेली ही दुर्गंधी पुन्हा काही दिवसांपासून सुरू आहे. नाल्यातील पाण्यालाही तेलासारखा तवंग आल्याचे दिसत आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. मात्र कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही.

प्रदूषण मंडळाचे अधिकारी टी. बी. पाटील यांच्याशी संपर्क केला असता, आमच्याकडे याविषयी अद्याप कोणतीही तक्रार आली नसून संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देऊन योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील असे त्यांनी सांगितले.