नवी मुंबई : पावणे एमआयडीसी परिसरातील टीटीसी औद्योगिक क्षेत्रात एका भूखंडालगत असलेल्या नैसर्गिक नाल्याच्या जागेत भराव टाकण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात नागरिकांकडून तक्रार दाखल झाल्यानंतर एमआयडीसी प्रशासनाने प्रत्यक्ष जागेची पाहणी करून संबंधित अतिक्रमण १५ दिवसांच्या आत काढले जाईल, असे कळवले आहे.

टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील भूखंड क्रमांक सी-२१/८ या ठिकाणी भूखंडाच्या मागील बाजूस असलेल्या नैसर्गिक नाल्याच्या जागेत राडारोड्याचा भराव करण्यात आला आहे. तसेच नाल्यालगत तात्पुरत्या स्वरूपाचे शेड आणि विटांचे बांधकाम उभारण्यात आले असल्याचे पाहणीत आढळले. या नाल्यांचा उपयोग पावसाळ्यातील पाणी वाहून नेण्यासाठी होत असल्याने अशा प्रकारचा भराव भविष्यात अडचणी निर्माण करू शकतो, अशी चिंता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मागील वर्षाच्या पावसात नैसर्गिक नाले व्यवस्थित कार्यरत नसल्याने नवी मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे प्रकार घडले होते. भविष्यात असे प्रकार उद्भवू नयेत म्हणून योग्यती काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.

या बाबत नवी मुंबई विकास अधिष्ठान संस्थेचे अध्यक्ष संकेत डोके यांनी एमआयडीसीकडे लेखी तक्रार सादर केली होती. तक्रारीची दखल घेत एमआयडीसी विभाग क्रमांक २, महापे येथील अधिकाऱ्यांनी संबंधित भूखंडाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान संबंधित भूखंडधारकाने केलेले अनधिकृत बांधकाम आणि भराव काढून टाकण्याचे काम पुढील १५ दिवसांत केले जाईल, असे कळवण्यात आले आहे. एमआयडीसी प्रशासनाच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित प्रकरणाची दखल घेण्यात आली असून नियमानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. तसेच नागरिकांनी महामंडळाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

पावणे एमआयडीसी परिसरातून वाहणारे नैसर्गिक नाले पावसाचे पाणी सुरक्षितपणे खाडीकडे नेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे अशा नाल्यांची रुंदी, खोली आणि प्रवाह कायम राखणे आवश्यक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. एमआयडीसीकडून देण्यात आलेल्या आश्वासनानुसार अतिक्रमण हटवले जाते का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष पाहणी केली असता भूखंडावर अनधिकृत बांधकाम आढळून आले आहे. हे बांधकाम येत्या १५ दिवसांत हटवण्याचे भूखंडधारकाने आश्वासन दिले आहे. अन्यथा प्रशासनामार्फत या अनधिकृत अतिक्रमणावर कारवाई करण्यात येईल. – दिलीप आव्हाड, कार्यकारी अभियंता, महापे एमआयडीसी