scorecardresearch

नवी मुंबईत शांतता: ४५ मनसे कार्यकर्त्यांची धरपकड; पनवेलमध्ये एक गुन्हा दाखल

मशिदींसमोर हनुमान चालीसाचे पठण करण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्यानंतर बुधवारी पहाटेपासून नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील सर्व मशिदींसमोर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

(नेरुळ येथील जामा मशिदीसमोर लावलेला बंदोबस्त. (छायाचित्र : नरेंद्र वास्कर) )

नवी मुंबई, पनवेल, उरण : मशिदींसमोर हनुमान चालीसाचे पठण करण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्यानंतर बुधवारी पहाटेपासून नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील सर्व मशिदींसमोर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी कलम १४९ कायद्यांतर्गत तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार ४५ जणांना ताब्यात घेतले तर पनवेलमध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्तालय क्षेत्रात शांतता आणि कायदा सुव्यवस्था बिघडण्याचे कोणतेही प्रकार समोर आले नाही, असे पोलिसांनी सांगितले. पनवेलमध्ये फक्त एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बुधवारी सायंकाळी या संदर्भात वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची एक महत्वाची बैठक पार पडली. मात्र याबाबत गुप्तता पाळण्यात आली.
मशिदीच्या विश्वस्तांना पहाटेच्या वेळी भोंग्याचा वापर करून नमाज पठण करू नये, असे आवाहन पोलिसांनी केल्याने पहाटे काही मशिदींमध्ये भोंग्याचा वापर करणे टाळण्यात आले. मनसे कार्यकर्ते भोंगे लावण्याच्या तयारीत होते, मात्र मशिदीतून आवाज न आल्याने मशिदीसमोर भोंगे लावण्याचा प्रकार घडला नाही. पोलिसांनी ऐरोली येथून पाच जणांना व परिमंडळ दोनमधून दोन जणांना अटक केली आहे. ही कारवाई परिमंडळ एक, दोन आणि विशेष शाखेने संयुक्त केली.
पनवेलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी विविध वसाहती व गावांतून ताब्यात घेतले आहे. सकाळी ६ वाजताची अजान भोंग्यांवरून दिली नसल्याने मनसेला पनवेलमध्ये आंदोलन करता आले नाही. मात्र प्रक्षोभक संदेश समाजमाध्यमांवर पसरविल्याचा ठपका ठेवत मनसेच्या दोन कार्यकर्त्यांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली. पनवेल शहरात १४ मशिदींवरील भोंग्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. मनसेचे नवनिर्वाचित पनवेल शहराध्यक्ष योगेश चिले यांच्यासह तानाजी पिसे व सचिन जाधव यांनी भोंगे वाजविण्याचा प्रयत्न केल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या पथकाने पिसे व जाधव यांना ताब्यात घेतले. चिले यांचा पोलीस शोध घेत आहेत. तळोजा गाव आणि वसाहतीच्या परिसरात मनसेचे पदाधिकारी रामदास पाटील व कैलास माळी यांच्यासह १० कार्यकर्ते तयारीत होते. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी पथकासह वेळीच पोहोचून पाटील यांच्यासह आंदोलकांना भोंग्यासह ताब्यात घेतले. खारघर वसाहतीमध्ये मनसेचे शहराध्यक्ष प्रसाद परब यांच्यासह सहा जणांना अटक करण्यात आली.
उरण पोलिसांनी येथील मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याची माहिती उरण पोलिसांनी दिली. यामध्ये रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, मनसे वाहतूक सेनेचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस अल्पेश कडू, रायगड उप-जिल्हा संघटक सतीश पाटील, उरण तालुका उपाध्यक्ष मंगेश वाजेकर, मनसेचे उरण तालुका संघटक रितेश पाटील यांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली.
६८ मशिदींमध्ये कमी आवाजात अजान
६८ मशिदींमध्ये कमी आवाजात अजान व नमाज झाले. तर २३ मशिदींमध्ये अजान वाजले नाही. मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते अशा ११५ जणांना नोटीस देण्यात आल्या होत्या. आयुक्तालय क्षेत्रात ९ मंदिर आणि ७२ मशिदींनी भोंग्याची परवानगी काढली असून त्याचा कालावधी एक वर्षांचा असल्याचे विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त रुपाली अंबुरे यांनी सांगितले.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ४५ जणांना अटक केले. यात परिमंडळ एकमधील ३० जणांचा समावेश आहे. भोंगे वाजवल्याने पनवेलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. – सुरेश मेंगडे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Peace navi mumbai mns activists arrested case panvel mosques mns president raj thackeray amy

ताज्या बातम्या