फटाक्यांची घाऊक खरेदी ; पनवेल, पालीत खरेदीदारांच्या रांगा; करोना नियमांचा विसर

यंदाच्या या फटाके विक्री केंद्रांवर चिनी बनावटीच्या फटाक्यांना मात्र अलविदा करण्यात आले असल्याचे दिसून आले

नवी मुंबई : राज्य सरकारने फटाकेविना दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले असले तरी बालहट्टामुळे दिवाळीत फटाके खरेदी करावे लागत असल्याचे दिसून आले आहे. मात्र वाढत्या किमती पाहता शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या फटाके विक्रीला बगल देऊन अनेक पालकांनी पनवेल व खोपोली, पाली मार्गावरील कंपनी पुरस्कृत दुकानांकडे मोर्चा वळविला आहे.

या ठिकाणी असलेल्या फटाक्यांच्या दुकानासमोर लागलेल्या रांगांमध्ये करोना नियमांची पायपल्ली सर्रास केली जात असून एक ते दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर फटाके बच्चेकंपनीच्या हाती पडत आहेत. दुकानाबाहेर ‘नो मास्क, नो इंट्री’चे फलक नावापुरते लावलेले आहेत.

महापालिकांच्या वतीने शहराच्या मध्यवर्ती किंवा निर्जन भागात एकाच ठिकाणी फटाक्यांच्या दुकानांना परवानगी दिली जात असल्याचा अनुभव आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फटाकेविना दिवे लावून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. त्याला अनेक ठिकाणी तिलांजली दिली जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे गेले दोन दिवस फटाके खरेदीसाठी अक्षरश: झुंबड उडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे फटाके विक्रेत्यांना श्वास घेण्यासदेखील उसंत नाही. गेल्या वर्षी दिवाळीत या फटाके विक्रेत्यांचे देखील दिवाळे निघाल्याने यंदाचा धंदा अधिक जोमाने आणि कष्टाने केला जात आहे.

 यंदाच्या या फटाके विक्री केंद्रांवर चिनी बनावटीच्या फटाक्यांना मात्र अलविदा करण्यात आले असल्याचे दिसून आले. त्यामुळे बनारस येथील, शिवकाशी येथील बनावटीच्या भारतीय फटाक्यांना मोठी मागणी आहे. शहराच्या कानाकोपऱ्यांत स्टॉल टाकून बसलेले किरकोळ विक्रेते हे या फटाक्यांच्या विक्रीतून जास्तीत जास्त नफा मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याने १०० रुपये किमतीचा एखादा फटाका या ठिकाणी हमखास दुप्पट दराने विकला जात असल्याचे दिसून येते. यावर उपाय म्हणून अनेक पालक पनवेल येथील तक्का गावाशेजारी असलेल्या वर्षभर घाऊक विक्री करणाऱ्या दुकानातून फटाके खरेदी देण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून येते.

याशिवाय दोन वर्षांपासून खोपोली-पाली मार्गावर काही बनारस येथील कारखानदारांनी विस्र्तीण अशा जागा विकत घेऊन फटाक्यांची घाऊक विक्री सुरू केली असून या ठिकाणी फटाके खरेदीसाठी रांगा लागत असल्याचे दिसून येते. स्वस्त दरात मिळणारे हे फटाके खरेदीसाठी गेला आठवडाभर मोठय़ा प्रमाणात

गर्दी होत असल्याने विक्रेत्यांनी टोकन पद्धतीने विक्री सुरू केली आहे. त्यानंतरही दोन ते तीन तास रांगेत उभे राहिल्यानंतर खरेदी केली जात आहे. विशेष म्हणजे रांगेत तिष्ठत राहणाऱ्या ग्राहकांसाठी घाऊक विक्रेत्यांनी चहा व पाण्याची व्यवस्था केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: People prefer to purchase firecrackers from wholesale shop zws

Next Story
विजयी भव !