सात वर्षांच्या मुलीवर अपोलो रुग्णालयात गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

नवी मुंबई : गुजरातमधील एका सात वर्षांच्या मुलीची ९० अंशांत कायमस्वरूपी झुकलेली मान एका गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करून नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाला सरळ करण्यात यश आले आहे. वैद्यकीय क्षेत्रात अशा प्रकारची शस्त्रक्रिया यापूर्वी झाल्याचा दाखला नाही. या शस्त्रक्रियेमुळे ही मुलगी आता सर्वसामान्य जीवन जगणार असून तिला मान हलविण्यास कोणताही अडथळा येणार नाही, असा दावा अपोलोच्या वतीने करण्यात आला आहे.

गुजरात वलसाडमध्ये राहणाऱ्या तिवारी दाम्यत्यांची सौम्या ही सात वर्षांच्या मुलीची मान तंतुमय टय़ुमर असल्याने ९० अंशांत कललेली होती. दोन शस्त्रक्रिया केल्यानंतरही हा टय़ुमर काढता आला नाही. त्यामुळे मुलीचा मान वाकडी होती. त्याचा तिला मोठय़ा प्रमाणात त्रास होत होता. चोहोबाजूने मान फिरवण्यास येणारा अडथळा व अशा प्रकारे सातत्याने कलती राहणाऱ्या या मानेच्या विकाराला ‘टॉर्टिकॉलीस’असे वैद्यकीय भाषेत म्हटले जाते. स्नायू आक्रसले होते. त्याचप्रमाणे कॉलर हाड व कवटीचे हाडदेखील अस्थिमय पट्टीने एकत्र जुळले होते. त्यामुळे तिचे डोके शरीराला अशा प्रकारे जोडले गेले होते की, तिला सर्वसामान्य हालचाल करणे अशक्य होते.

यावर डॉक्टरांना शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. मात्र अशा प्रकारे जोड वेगळा करण्याची शस्त्रक्रिया करणे अवघड होते. यापूर्वी अशा प्रकारची शस्त्रक्रिया केल्याचा दाखला ‘मेडिकल जर्नल’मध्ये नाही असा दावा केला जात आहे. त्यामुळे ही गुंतागुतीची शस्त्रक्रिया एक प्रकारचे आव्हान होते.

नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात शेवटचा प्रयत्न म्हणून या मुलीच्या पालकांनी दाखल केले. अपोलो रुग्णालयाच्या विशेष पथकाने ही यशस्वी शस्त्रक्रिया केली असून मुलीला आता सर्वसामान्य आयुष्य जगता येणार आहे. यासाठी स्पाइन सर्जरी, पोडियाट्रिक, ऑर्थोपेडिक विभागांतील डॉक्टरांनी या मुलीची संपूर्ण तपासणी करून डॉ. अग्निवेश टिकू यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

जगातील ०.४ बालकांना अशा प्रकारचा त्रास होतो. यात मुलांचे प्रमाण जास्त असून मुलींचे प्रमाण कमी आहे. या मुलीवर नऊ महिन्यांची असताना पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतर ही मुलगी सर्वसामान्य मुलीसारखी मान फिरवू शकणार आहे.

या यशस्वी शस्त्रक्रिबद्दल मुलीचे वडील नीलेश तिवारी यांनी आनंद व्यक्त केला आहे, तर पालकांचा विश्वास आम्ही खरा ठरविल्याचा आनंद असल्याचे अपोलोचे मुख्य अधिकारी संतोष मराठे यांनी मत व्यक्त केले.