नवी मुंबई : पनवेल महापालिका क्षेत्रातील रिक्षा चालकांवर जोरदार मोहिमेद्वारे मंगळवारी कारवाई करण्यात आली आहे. यात ३५० रिक्षा तपासणी केली असून ३४ बेकायदा रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. एका रिक्षा चालकाने चोरीच्या उद्देशाने एका प्रवाशावर हल्ला केल्या नंतर पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग खडबडून जागा झाला त्यातूनच हि संयुक्त मोहीम राबवण्यात आली आहे.
पनवेल परिसरात बहुतांश रिक्षा चालकांची मुजोरी वाढली असून त्यात अनेक बेकायदा रिक्षा चालवणाऱ्यांचा समावेश आहे. त्यांची पडताळणी वाहतूक पोलीस वा उपप्रादेशिक परिवहन विभाग करीत नाही . त्यामुळे बेकायदा रिक्षा चालकांचा प्रचंड सुळसुळाट वाढला आहे. याबाबत तक्रारी येऊनही फारशी दखल घेतली जात नव्हती. मात्र १४ तारखेला पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत एका प्रवासी व्यक्तीला लुटण्याच्या उद्देशाने त्याच्यावर चाकू हल्ला रिक्षा चालकाने केला होता. त्यात प्रवासी जखमी झाला होता. या घटनेची दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुशंघाने मंगळवारी पनवेल परिसरात उपप्रादेशिक अधिकारी आणि वाहतूक पोलीस यांनी संयुक्त मोहीम राबवत कारवाई केली आहे.
पनवेल वाहतुक शाखा यांनी पनवेल रेल्वे स्टेशन पूर्व व पश्चिम बाजू कडील सर्व अवैद्य रिक्षा चालकांची पडताळणी मोहीम राबवली. तसेच अवैद्य प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा चालक, विना फिटनेस, इन्शुरन्स संपलेल्या रिक्षा , विना परवाना , विना गणवेश , अश्या रिक्षा चालक /मालक यांच्यावर उपप्रादेशिक परिवहन पोलीस विभाग आणि वाहतूक पोलीस विभागाने कारवाई केली. एकूण पाच पथकांमार्फत विशेष मोहीम राबविण्यात आली. या वेळी महिला प्रवासी व स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
या कारवाईत एकूण ३५० रिक्षा तपासणी करण्यात आल्या. त्यातील १८० रिक्षांवर कारवाई करण्यात आली. यात तब्बल ३४ रिक्षा अवैध असल्याने निदर्शनास आल्याने जप्त करण्यात आल्या आहे. विविध कायदा उल्लंघन प्रकरणी १ लाख ६८ हजार ९० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून हा दंड वसूल करण्यात आला आहे. अशी माहिती पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी दिली आहे.
चाकू हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हि कारवाई केली गेली मात्र पनवेल मध्ये जवळचे भाडे नाकारणे, अचानक रिक्षा थांबवणे, चार ते पाच प्रवासी घेणे, असे प्रकार नित्याचे झाले आहेत. त्यात मीटर प्रमाणे भाडे न घेण्याचा प्रकार सर्रास होत असून याचा सकाळी सकाळी बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांना याचा सर्वाधिक सामना करावा लागतो. त्यामुळे कारवाईत सातत्य राखणे गरजेचे असल्याचे अनुप पाटील या प्रवाशाने प्रतिक्रिया देताना सांगितले.

