राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात फेसबुकवर हिणकस मजकूर प्रसारित करणारी टिव्ही मालिकांतील अभिनेत्री केतकी चितळे हिला रविवारी ठाणे न्यायालयाने १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज याच प्रकरणामध्ये ठाणे पोलिसांनी केतकीच्या नवी मुंबईमधील घरी जाऊन तपास केला. तिच्या घरुन लॅपटॉप, डेस्कटॉप कंप्युटरसहीत संशयास्पद वस्तू पोलिसांनी घरातून जप्त केल्या आहेत.

नक्की वाचा >> केतकी चितळे प्रकरण : तृप्ती देसाईंचा केतकीला पाठिंबा; म्हणाल्या, “तिने जी पोस्ट टाकलीय त्यामध्ये पवार…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज दुपारी तीनच्या सुमारास ठाणे पोलीस केतकीला घेऊन तिच्या कळंबोली येथील घरी दाखल झाले. त्यांनी घरातील लॅपटॉपसहीत इतर काही वस्तू ताब्यात घेतल्यात. यानंतर केतकीला घेऊन पोलीस पुन्हा ठाण्याला रवाना झाले. सुमारे एक ते दीड तास केतकीच्या घरी तपास सुरु होता.

दरम्यान, मुंबईतही तिच्यावर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केतकी चितळे हिने तिच्या फेसबुक खात्यावर शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला होता. तिच्याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवर टिकेची झोड सुरू केली आहे.

नक्की वाचा >> सदाभाऊ खोत म्हणाले, “केतकी चितळेचा अभिमान वाटतो”; NCP कार्यकर्त्यांनी त्यांच्या ऑफिसात जाऊन…

राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष स्वप्नील नेटके यांनी शनिवारी तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याआधारे तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट एकने तिला शनिवारी नवी मुंबईतील कळंबोली येथून अटक केली होती. रविवारी सकाळी तिला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायालयाने तिला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती युनीट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी दिली. या मजकुराखाली वकील नितीन भावे असा उल्लेख आहे. त्यामुळे नक्की हा मजकुर केतकीने लिहिला आहे की आणखी कोणी, तसेच नितीन भावे ही व्यक्ती नक्की कोण आहे, याचा तपासही सुरू करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

केतकी हिच्यावर मुंबईतही तीन गुन्हे दाखल झाले आहेत. भोईवाडा, गोरेगाव व गोरेगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून याप्रकरणी आम्ही कायदेशीर सल्ला घेत असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police collected laptop and other evidences from ketki chitale home in navi mumbai scsg
First published on: 16-05-2022 at 18:22 IST