उरणमध्ये विजेचा लपंडाव; नागरिक उकाडय़ाने हैराण
उरण तालुक्यात वीज खंडित होण्याच्या घटनात वाढ झालेली असून उरण शहर, केगाव, नागाव तसेच तालुक्यातील इतर ठिकाणची वारंवार वीज जात असल्याने जाळून काढणाऱ्या उकाडय़ाने नागरिक हैराण झाले आहेत. त्यात ही वीज रात्रीच्या वेळी ऐन झोपेत खंडित होत असल्याने त्याचा त्रास होऊ लागल्याने संतप्त झालेल्या नागरिकांना महावितरण कंपनीच्या कार्यालयावर जाब विचारण्याचा प्रयत्न करीत मागील आठवडय़ात कार्यालयाची तोडफोड केल्याने सध्या रात्रीच्या वेळी या कार्यालयांवर पोलीस संरक्षण दिले जात आहे.
उरण तालुक्यातील अनेक भागात वीजपुरवठा करणाऱ्या विजेच्या तारा व खांब तसेच इतर साहित्य नादुरुस्त होण्याच्या घटनात वाढ झालेली आहे. गुरुवारी केगाव परिसरातील वीज खंडित झाल्याने येथील ग्रामस्थ संतप्त झालेले असतानाच शनिवारीही वीज खंडित झाल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला होता. त्यामुळे रात्री दोन वाजेपर्यंत नागरिक महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर जमले होते. तर उरण शहरातील विविध भागात दररोज सकाळी, संध्याकाळी आणि रात्री वीज खंडित होण्याच्या घटना वाढू लागल्या असल्याचे मत उरणमधील नागरिक संतोष ठाकूर यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे रात्रीची झोप लागत नाही तसेच मुलांना अभ्यासही करता येत नाही. यासंदर्भात उरणच्या महावितरणचे सहाय्यक अभियंता पी.एस.साळी यांच्याशी संपर्क साधला असता केगावमधील झंपर तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. तर उरण शहरात कावळे वीज वाहक तारांवर बसल्याने त्यांना धक्का लागल्याने वीज खंडित होत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तर वारंवार वीज खंडित होण्याच्या घटना होत असल्याने नागरिक कार्यालयावर येऊ लागल्याने दक्षता म्हणून पोलीस बंदोबस्त मागण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.