दिघा अनधिकृत इमारती प्रकरण

दिघा परिसरात एमआयडीसी आणि सिडकोच्या जागेवर वसलेल्या ९९ अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरू असताना लोकप्रतिनिधींनी मात्र न्यायालयाचा अवमान करणारी फलकबाजी आरंभली आहे. ही बांधकामे तोडण्यास स्थगिती देण्याचे निर्देश देत सरकारने न्यायालयात भूमिका स्पष्ट करावी, अशी सूचना विधान परिषदचे उपसभापती वसंत डावखरे यांनी विधिमंडळात केली आहे. मात्र सरकारने याविषयी कोणताही निर्णय घेतला नसून न्यायालयात भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ापासून उर्वरित कारवाईला सुरुवात होणार असे संकेत एमआयडीसी व सिडकोच्या आधिकाऱ्यांनी दिले आहेत. असे असताना सर्वच पक्षांचे राजकीय नेते फलकबाजी करून नागरिकांची दिशाभूल करीत आहे.

प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपाच्या नगरसेविका उज्ज्वला विकास झंजाड व शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक २ च्या नगरसेविका शुभांगी जगदीश गवते यांनी अशी फलकबाजी केली आहे. तर नवीन गवते आणि अपर्णा गवते, दीपा गवते यांनी  दिलेले निवेदन समाजमाध्यमांवर झळकावले आहेत. पाडकामाची कारवाई अटळ असल्याने रहिवाशांची समस्या आपण दूर केल्याचा या लोकप्रतिनिधींचा दावा पोकळ ठरला आहे.