पालिका निवडणुकीसाठी शेतघरांत राजकीय बैठका?

नवी मुबंई पालिकेच्या प्रभाग रचनेसाठी राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिल्यानंतर ही रचना पुढील आठवडय़ात जाहीर होणार आहे.

नवी मुंबई : नवी मुबंई पालिकेच्या प्रभाग रचनेसाठी राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिल्यानंतर ही रचना पुढील आठवडय़ात जाहीर होणार आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिकेचे पडघम वाजू लागल्याचे संकेत राजकीय वर्तुळात घुमू लागले असून सर्व पक्षांचे प्रमुख उमेदवार कार्यरत झाले आहेत.

यंदा पहिल्यांदाच बहुसदस्यीय पद्धतीने पालिका निवडणूक होत असल्याने आजूबाजूच्या दोन उमेदवारांना सोबत घेऊन काम करण्याची व्यूहरचना आखली जात आहे. या मित्रपक्षामध्ये विभिन्न पक्षाच्या तीन उमेदवारांनी बैठकींचा धुमधडका सुरू केला आहे. त्यासाठी पनवेल, उरण, कर्जत येथील शेतघरांना प्राधान्य दिले जात आहे.

नवी मुंबई पालिका प्रशासकांनीही आता निवडणूक घेण्यास अनुकूलता दाखवली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोग सक्रिय झाले असून सर्व कार्यक्रम ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय व पालिकेला दिला आहे. त्यामुळे सर्वपक्षीय इच्छुक उमेदवार हे तयारीला लागले असून आपल्या प्रभागाजवळचा मित्रपक्ष शोधण्याचे काम सुरू आहे. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार हे कमी रिंगणात उतरणार असल्याने त्यांची संख्या बहुसदस्यीय पद्धतीने घटली आहे. यापूर्वी या संभाव्य नगरसेवकांनी लाखो रुपयांची उधळण केली असून आता निवडणूक आचारसंहिता जाहीर होण्याची वाट पाहिली जात आहे.

शहरात तीन नगरसेवकांचा मिळून एक असे ४० प्रभाग, तर दोन नगरसेवकांचा मिळून एक प्रभाग असे एकूण ४१ प्रभाग होणार आहेत. प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करण्याची मुदत वाढवून २४ नोव्हेंबपर्यंत केल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त अमरिश पटनिगिरे यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Political meetings farms municipal elections ysh