नवी मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील सत्तासंघर्ष टिपेला पोहचल्याचे चित्र सातत्याने दिसत असतानाच नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डाॅ. कैलास शिंदे यांनी गेल्या आठवड्यात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तपदाचा कार्यभार डाॅ. कैलाश गायकवाड यांच्याकडे सोपविल्याने शिंदे-नाईक राजकीय संघर्षाला पुन्हा एकदा धार आली आहे.

महापालिकेत वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असणारे गायकवाड यांच्याकडे आधी उपायुक्तपद सोपविण्यात आले आणि आता त्यांची थेट अतिक्रमण नियंत्रकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अलीकडच्या काळात वनमंत्री गणेश नाईक यांच्या निकटवर्तीयांपैकी ओळखले जाणारे गायकवाड यांची या पदावर नियुक्ती झाल्याने शिंदे गटातील स्थानिक नेत्यांना नाईक यांनी हा धक्का दिल्याची चर्चा आता रंगली आहे.

महाविकास आघाडीचे सरकार पाडून राज्यात तीन वर्षांपूर्वी जो सत्ता बदल झाला त्यानंतर मुंबई महानगर प्रदेशात आणि विशेषत: ठाणे शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय पकड बसविताना अतिक्रमण विभागाचा केलेला वापर सातत्याने चर्चेत आला होता. ठाणे महापालिकेतील सहायक आयुक्त महेश आहेर यांच्याकडे हे पद सोपवून शिंदे गटाने विरोधकांना नामोहरम केल्याची चर्चाही तेव्हा या भागात उघडपणे होती.

शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद असताना त्यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर स्वत:ची पकड मिळवली होती. महापालिकांमधील मोक्याच्या नियुक्त्या या शिंदे म्हणतील तशाच पद्धतीने होत असत. नवी मुंबईत गणेश नाईक यांची राजकीय पकड राहिली असली तरी मागील अडीच वर्षांत मात्र शिंदे म्हणतील तशाच पद्धतीने येथील कारभार सुरू होता. नव्या सरकारमध्ये मंत्रीपद पदरात पडल्यानंतर मात्र नाईक यांनी आक्रमकपणे वाटचाल सुरू केली असून नवी मुंबई महापालिकेतील मोक्याच्या नियुक्त्यांवर स्वत:चे नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न नाईक गोटाकडून सुरू झाल्याचे चित्र आता दिसू लागले आहे.

वैद्यकीय अधिकारी गायकवाड आता अतिक्रमण प्रमुख

महापालिका निवडणुका तोंडावर येऊ लागल्याने एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. मध्यंतरी ठाकरे आणि पवार गटातील नगरसेवकांना आपल्या पक्षात आणून शिंदे यांनी गणेश नाईक यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. गणेश नाईक यांच्या ठाण्यातील जनता दरबारांना उत्तर देताना ‘आम्ही जनतेच्या दरबाराचे सेवक आहोत’ असे उत्तर शिंदे यांनी दिले होते. शिंदे-नाईक यांच्यातील ही जुगलबंदी कायम असताना नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तपदी डाॅ. कैलाश गायकवाड यांची नियुक्ती झाल्याने शिंदे गटातील स्थानिक नेते अवाक झाले आहेत.

महापालिकेचा अतिक्रमण विभाग, शहरातील महत्त्वाचे प्रभाग अधिकारी नियुक्त्यांमध्ये पुन्हा एकदा नाईक सक्रिय झाल्याची चर्चा आहे. मध्यंतरी तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली या विभागात झालेल्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही गणेश नाईक यांच्या सूचनेनुसार झाल्याचे सांगितले जाते. असे असताना अतिक्रमण विभागाचा कार्यभार थेट कैलाश गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आल्याने आयुक्त कैलाश शिंदे यांच्या या निर्णयाविषयी महापालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पाटकर, लाड, चौगुले अडचणीत?

– एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटकर यांच्या प्रभागातील अलबेला, नैवेद्य यासारख्या इमारती विनापरवानगी बांधण्यात आल्याचा मुद्दा मध्यंतरी गाजला होता. या इमारतींचे वीज आणि पाणी जोडणी तोडा असे आदेश महापालिका अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

-पाटकर आणि अविनाश लाड या शिंदे गटातील नेत्यांनी या प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्याकडेही गाऱ्हाणे मांडले आहे.

-ऐरोलीत विजय चौगुले यांच्याशी संबंधित असलेल्या मालमत्तांमधील बेकायदा बांधकामे पाडण्यासाठी महापालिकेवर दबाव आहे.

-या पार्श्वभूमीवर नाईक यांच्या मर्जीतील कैलाश गायकवाड यांची अतिक्रमण विभागाच्या प्रमुख पदावर झालेली नियुक्ती चर्चेत आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी मुंबई महापालिकेत प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने बदल्या करण्यात आलेल्या आहेत.- शरद पवार, उपायुक्त, प्रशासन विभाग