नवी मुंबई : कल्याण तालुक्यातील १४ गावांच्या समावेशावरुन एकनाश शिंदे यांची शिवसेना आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या कलगीतुरा रंगला असतानाच ही गावे महापालिका निवडणुकांपर्यत नवी मुंबई महापालिका हद्दीतच राहतील अशी चिन्हे आता दिसू लागली आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने महापालिका हद्दीत प्रभाग रचनेसंबंधीचा कार्यक्रम स्थानिक प्राधिकरणांना देऊ केला आहे. हा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे ही गावे महापालिका हद्दीतच राहतील अशी माहिती वरिष्ठ प्रशासकीय सूत्रांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबईच्या विविध प्रश्नांसाठी एका बैठकीचे नुकतेच वर्षा बंगल्यावर आयोजन करण्यात आले होते. वनमंत्री गणेश नाईक यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस सिडको, महापालिका तसेच नगरविकास विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत १४ गावांच्या समावेशाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. निवडणूक आयोगाने महापालिका हद्दीतील प्रभाग रचनेसंबंधीची कार्यवाही सुरू करण्याचे वेळापत्रक आखून दिल्याने ही गावे तांत्रिकदृष्ट्या वगळता येणार नाहीत असा मुद्दा या बैठकीत पुढे आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. यासंबंधी स्वत: नाईक आणि इतर कुणीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी कल्याण तालुक्यातील १४ गावे नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात मोडत असलेली ही गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करून त्याचा राजकीय लाभ डाॅ.शिंदे यांना मिळेल अशा पद्धतीची आखणी या निर्णयामागे होती. असे असले तरी राज्यातील श्रीमंत महापालिकांपैकी एक असणाऱ्या नवी मुंबई महापालिकेवर या गावांचा आर्थिक भार पडेल अशी भीती व्यक्त होत आहे. अभिजीत बांगर यांच्याकडे महापालिकेचे आयुक्तपद असताना त्यांनी या गावाच्या विकासासाठी सहा हजार कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचा अहवाल सरकारकडे पाठविला होता.
नेमका हाच धागा पकडून वन मंत्री गणेश नाईक यांनी या गावांच्या समावेशास विरोध केला आहे. ही गावे महापालिका हद्दीतून वगळण्यात यावीत अशा स्वरुपाची मागणी नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून या मुद्द्यावरुन शिंदे आणि नाईक यांच्यातील संघर्ष आणखी वाढला आहे.
शिंदेकडून विशेष निधी ?
कल्याण तालुक्यातील १४ गावे नवी मुंबई महापालिका हद्दीत आली असली तरी राजकीय संघर्षामुळे महापालिकेने अजूनही या गावांसाठी फारसा विकास निधी वर्ग केलेला नाही. या गावांमध्ये महापालिकेने कोणतेही मोठे विकासकाम हाती घेतलेले नाही. त्यामुळे या गावांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघात मोडत असलेल्या या गावांमध्ये निधी द्यावा अशी मागणी शिंदे यांच्या शिवसेनेचे स्थानिक आमदार राजेश मोरे यांनी याूर्वीच केली आहे. ही मागणी लक्षात घेऊन नगरविकास विभागाकडून या गावांसाठी विशेष निधी देता येईल का याची चाचपणी सुरु असल्याची माहिती नगरविकास विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.