लोकसत्ता प्रतिनिधी

पनवेल : तळोजातील निडीलॅक्स फाईन केम कंपनीत बुधारी सायंकाळी राजस्थान येथून अवैधरित्या विल्हेवाटीसाठी टँकरमधून रसायन आणण्यात आले. निडीलॅक्स हा कारखाना अनेक महिने बंद आहे. बंद कारखान्यामधील तळोजा सामाईक रासायनिक सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या (सीईटीपी) वाहिनीमध्ये हे घातक रसायन विना प्रक्रिया थेट रिता करताना तळोजा पोलिसांनी रंगेहाथ पकडले. वरिष्ठ पोलीस निरिक्षक प्रविण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलीस उपनिरिक्षक ज्ञानेश्वर धुळगंडे यांनी केली. या प्रकरणी सध्या टॅंकरचालक व कंपनीच्या रखवालदारासह कंपनीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तळोजातील रासायनिक प्रकल्प चालविणाऱ्या कारखानदारांवर प्रदूषणाचे अनेक आरोप झाले आहेत. या आरोपांमुळे शेकडो कंपन्यांनी रायगड जिल्हाधिकारी यांच्या कोषागारात नदी संवर्धनासाठी १० कोटी रुपये सुद्धा जमा केले आहेत. परंतु अजूनही प्रत्यक्षात प्रदूषण कमी झाले नाही. नेमके प्रदूषण कोणता कारखानदार करतो याचा शोध पोलीस व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी लावू शकले नाहीत. बुधवारी या प्रकरणी तळोजा पोलिसांना पहिल्यांदा यश आले आहे.

गोपनीय माहितीनंतर पोलीस उपनिरिक्षक धुळगंडे यांचे पथक बुधवारी सायंकाळी सव्वापाच वाजता तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये दीपक फर्टीलायझर कंपनीशेजारी भूखंड क्रमांक डब्ल्यू ७५ येथील निडीलॅक्स फाईन केम या कंपनीसमोर दबा धरुन बसले. उपनिरीक्षक धुळगंडे यांचे पथक काही वेळाने निडीलॅक्स कंपनीत शिरल्यावर तेथे तळोजा सीईटीपीच्या वाहिनीत सोडताना पोलिसांनी पकडले. तेथेच ई- साक्षीच्या साह्याने सर्व पुरावे गोळा करण्यात आले. पोलिसांनी केलेल्या संपर्कानंतर तेथे तासाभरात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी उमेश जाधव आले. त्यांनी घटनास्थळावरील रसायनांचे नमुने घेतले. नमुण्याच्या परीक्षणानंतर ब्रोमीन हे घातक रसायनाने भरलेला टॅंकरमध्ये आढळले.

निडीलॅक्स ही कंपनी औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे बंद असल्याचे मालकांनी कळवले आहे. बंद कंपनीआड अवैध उद्योग केल्यामुळे कंपनीचा मालक इम्रान अतिक बादशाह शेख (वय ३३) याच्यासह कंपनीचा पर्यवेक्षक प्रकाश राजकुमार भारतीय ( वय २२), टॅंकरचालक बलवंतसिंह मेहलसिंह यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत संबंधित घातक रसायन राजस्थान येथील पाली जिल्ह्यातील जादरी येथील श्री कृष्णा केमो फार्मा या कंपनीच्या मालकांनी विल्हेवाटासाठी पाठवल्याचे समजले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्जबाजारीपणाचे कारण

निडीलॅक्स या कंपनीत यापूर्वी भीषण आगीत दोन कामगार जखमी झाले होते. अटक आरोपी इम्रान याने पोलिसांना दिलेल्या माहितीत बंद कंपनीमुळे कर्ज झाल्याने त्याने काही महिन्यांपासून या गैरमार्गाचा अवलंब केल्याचे उजेडात येत आहे. परंतु पोलिसांच्या तपासात यापूर्वी अनेक प्रकरणात बादशाह नावाच्या व्यक्तीचा घातक रसायनांचे टॅंकर तळोजा, कळंबोली येथील खाडीक्षेत्र आणि वाहिन्यांमध्ये रिते करण्याचा अवैध धंद्यात समावेश असल्याचे आढळले आहे.