भूलथापांना बळी न पडण्याचे सिडकोचे आवाहन
नवी मुंबई : सिडकोच्या घरांचा ताबा देण्यासाठी काही मध्यस्थ, दलाल आणि संस्थांनी लाभार्थीशी संपर्क साधला असून पन्नास हजार ते एक लाख रुपये लाच घेऊन घरांचा ताबा देण्याचे आमिष दाखविले जात असल्याच्या तक्रारी सिडको प्रशासनाकडे आलेल्या आहेत. त्यामुळे सिडकोने महागृहनिर्मितीतील लाभार्थीनी भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.
सिडकोने अशा प्रकारे कोणत्याही संस्था व प्रतिनिधींचा नेमणूक केलेली नाही. लाभार्थीची अशा प्रकारे फसवणूक झाल्यास सिडको प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सिडकोच्या मागील काही सोडतीत अधिकारी व एका संस्थेच्या संगनमताने छाननीमध्ये घर मिळवून देण्याच्या कामासाठी लाखो रुपयांची लाच घेण्यात आल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत.
सिडकोने महागृहनिर्मितीतील घरांचा ताबा देण्यास १ जुलैपासून सुरुवात केली आहे. घरांचे सर्व हप्ते व देखभाल खर्च अदा करणाऱ्या लाभार्थीना सिडको घरांचा ताबा देत आहे. सिडकोने सध्या २५ हजार घरांचे बांधकाम सुरू केले असून ते खारघर, तळोजा, कळंबोली, घणसोली आणि द्रोणागिरी या सिडकोच्या पाच नोडमध्ये सुरू आहे. यातील पाच हजार घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू असून सिडकोबरोबर करारनामा व नोंदणी या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी सुरूआहेत. सिडको काही घरांचा ताबा कागदोपत्री देत आहे, पण लाभार्थीच्या घरांतील अंतर्गत कामे न झाल्याच्या तक्रारी आहेत. त्या दूर करण्याचा प्रयत्न सिडकोचा पणन विभाग करीत असून अभियंता विभाग कंत्राटदाराकडून ही कामे करून घेत आहे. सर्व हप्ते व देखभाल खर्च भरलेल्या ग्राहकांना टप्प्याटप्प्याने घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू असताना काही दलाल, मध्यस्थ, सामाजिक संस्था, घरांचा ताबा देतो असे सांगून पैसे उकळत असल्याच्या तक्रारी सिडकोच्या दक्षता विभागाकडे आलेल्या आहेत. अनेक ग्राहकांना सिडकोच्या या घरांची नितांत गरज आहे. सर्व हप्ते व देखभाल खर्च भरूनही घरांचा ताबा सिडकोच्या प्रक्रियेनुसार मिळणार आहे. त्यालाही वेळ लागत असल्याने या घरांचा ताबा लवकर देतो असे सांगून ग्राहकांकडून पैसे घेतले जात आहेत. बँकेचे हप्ते आणि भाडे अशा दुहेरी अर्थचक्रात अडकलेल्या लाभार्थीना हा घरांचा ताबा लवकर हवा आहे. त्यामुळे सिडकोशी संबंधित काही कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नावाने पैसे वसूल करीत असून सिडकोच्या या टप्प्याटप्प्याने ताबा देण्याच्या पद्धतीअगोदर टप्पा पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन हे पैसे वसूल केले जात आहेत. सिडकोने या भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन करताना अशा प्रकारे कोणाला पैसे दिले गेल्यास त्याची जबाबदारी सिडकोवर राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सिडकोच्या मागील काही सोडतीत लाभार्थीना बाद करून नंतर त्यांना पात्र करण्यात आल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आलेल्या आहेत. या पात्र लाभार्थीकडून लाखो रुपये लाच घेतल्याचे समजते. त्यामुळे प्रशासनाने काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्याची चर्चा आहे.
फसवणुकीच्या तक्रारी
या घरांच्या माहितीकरिता लाभार्थीनी केवळ सिडकोचे अधिकृत संकेतस्थळ, फेसबुक, यूटय़ूब, ट्विटर आणि सिडकोकडून काढण्यात येणाऱ्या प्रसिद्धी पत्रकांवरच विश्वास ठेवावा किंवा सिडको कार्यालयाशी संपर्क साधावा, असे ही सिडकोने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे. सिडको घरांच्या सोडतीत यापूर्वी अनेक वेळा अशा प्रकारे लोकांची फसवणूक झालेली आहे. यासाठी सिडकोने म्हाडाच्या धर्तीवर एक खासगी संगणक प्रणाली वापरली असून संगणक प्रणालीनेच लाभार्थीना घरांचे वाटप केले जात आहे. तरीही काही दलाल ग्राहकांची फसवणूक करीत असल्याच्या तक्रारी वाढीस लागलेल्या आहेत.
