उरण : गव्हाण फाटा ते चिंचपाडादरम्यानच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गावरून दररोज उरण-पनवेल असा प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना याचा फटका बसत आहे. तर येथील खड्ड्यांमुळे येेथे अपघाताचा सापळा रचला गेला आहे. मोठा अपघातही होण्याची शक्यता असल्याने हा मार्ग खड्ड्यांचा महामार्ग म्हणून ओळखला जात आहे.
उरण-पनवेलमध्ये विकासाच्या नावाने रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. मात्र सर्वसामान्य, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व महिला ज्या मार्गाने रोजचा प्रवास करतात त्या उरण-पनवेल मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावर एसटी किंवा खासगी प्रवासी वाहनाचा अपघात होऊ शकतो. यातील गव्हाण फाटा ते चिंचपाडा रस्त्याची चाळण झाली आहे. या मार्गाने प्रवास करणाऱ्या एसटी आणि इतर प्रवासी व दुचाकी वाहनचालकांना कंबरतोड करून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावरील गव्हाण फाटा ते बंबावी पाडा मार्गावर चिखलातून वाहने चालवावी लागत असल्याने मार्ग काढणे जिकिरीचे बनले आहे. वहाळ खिंड, ओवळे, पारगाव ते चिंचपाडा मार्गावरून वेगाने पाणी वाहत आहे, याचाही फटका बसत आहे.
जेएनपीए बंदर ते पळस्पे मार्गाचीही दुरवस्था
या मार्गाला समांतर असा जेएनपीए बंदर ते पळस्पे हा राष्ट्रीय महामार्गही आहे. मात्र गव्हाण फाटा ते बंबावी पाडादरम्यान रस्ता खराब आहे. या मार्गावर पर्यायी मार्गाचे काम सुरू असल्याने पनवेलकडे जाणारी व उरणला येणारी प्रवासी वाहने याच मार्गाने ये-जा करीत आहेत. या खड्ड्यांकडे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचआय) यांचेही दुर्लक्ष होत आहे. उरण-पनवेल मार्गावरील गव्हाण फाटा ते चिंचपाडा हा मार्ग सर्वसामान्य एसटी बसने प्रवास करणाऱ्यांचा आहे. मात्र या मार्गाच्या दुरुस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे या मार्गाची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी भालचंद्र घरत यांनी केली आहे.