‘महावितरण’कडून वेगवेगळे खुलासे
उरण शहर व परिसरात बुधवारी रात्री एक वाजता वीज गेल्याने अंधाराचे साम्राज्य पसरलेले होते. एकीकडे उकाडय़ाने हैराण झालेले असतानाच अचानकपणे रात्रीच्या वेळी वीज गेल्याने अनेकांना अंधारात राहावे लागले. त्यानंतर दुपारी एक वाजता म्हणजे तब्बल बारा तासांनी ही वीज पुन्हा आली. या कालावधीत उरणमधील व्यापारी, नागरिक तसेच विद्यार्थी त्रस्त झालेले होते. ऐन उन्हाळ्यात सातत्याने गायब होणाऱ्या विजेमुळे नागरिक त्रस्त झाले असून महावितरणकडून मात्र वीज गायब होण्याची विविध कारणे सांगितली जात आहेत.
उरण शहरातील वीज वारंवार गायब होणे हे नित्याचेच झालेले आहे. त्यामुळे येथील उद्योग व्यवसायांवरही परिणाम झाला आहे. त्यातच सध्या उकाडय़ाचे दिवस सुरू असल्याने विजेशिवाय रात्र काढणे कठीण झाले आहे. अशा वेळी रात्रीच्या झोपेच्या वेळेतच वीज गायब झाल्याने उरण शहर तसेच नवीन शेवे, नागाव, केगाव व म्हातवली आदी ठिकाणच्या नागरिकांना विजे विनाच रात्र काढावी लागली. महावितरणची अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व कामे सुरू आहेत. त्यामुळे वीज बंद केली जाते त्याचाही परिणाम सहन करावा लागत आहे. शहरातील वीज वाहक तारा कमकुवत झाल्याने तारा तुटल्याने वीज जाण्याच्या तसेच अनेक ठिकाणी झाड कोसळल्यामुळे वीज खंडित होण्याच्याही घटनात वाढ झाली असल्याचे मत उरणमधील व्यापारी प्रशांत ठाकूर यांनी दिली. तर दुसरीकडे शहरातील वीज खंडित झाल्याने बँकांच्या व्यवहारावरही परिणाम होत असल्याचे मत एका बँक अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे. त्यामुळे बँक कर्मचारी व ग्राहकांवरही परिणाम होत आहे.
या संदर्भात उरण महावितरण विभागाचे अभियंता पी. एस. साळी यांच्याशी संपर्क साधला असता रात्रीच्या वेळी उरण शहराजवळील डुक्करखाडी परिसरातील मुख्य विद्युत वाहिनी तुटल्याने ही वीज गेलेली होती. त्याची दुरुस्ती करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.