तारापूर येथील विराज प्रोफाइल ली. उद्योगात कार्यकारी संचालक या पदावर कार्यरत प्रदीप जाधव आत्महत्या प्रकरणातील आरोपी जितेंद्र प्रताप (जे. पी.) गर्ग यांना पालघर जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने त्यांना यापूर्वी देण्यात आलेल्या अंतरिम संरक्षणाची मुदत वाढविण्याची मागणी फेटाळून लावली.
या प्रकरणात प्रदीप जाधव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये जे. पी. गर्ग यांचे नाव नमूद असल्याचा आरोप असून, त्यानुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याची कलमेही गुन्ह्यात समाविष्ट करण्यात आली.
एससी-एसटी कायद्यांतर्गत कलमे लागू झाल्यानंतर गर्ग यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने यापूर्वीच फेटाळला होता. या कायद्याच्या कलम १८ नुसार अशा प्रकरणात अटकपूर्व जामिनाची तरतूद लागू होत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते.
दरम्यान, उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी वेळ मिळावा, तसेच अंतरिम संरक्षणाच्या काळात न्यायालयाने घातलेल्या सर्व अटींचे पालन केल्याचा दावा करत गर्ग यांनी अंतरिम संरक्षण वाढविण्याचा अर्ज दाखल केला होता. मात्र, अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. आर. रहाणे यांनी हा युक्तिवाद ग्राह्य धरला नाही. प्रारंभी केवळ बीएनएस कलम १०८ अंतर्गत गुन्हा नोंद असताना अंतरिम संरक्षण देण्यात आले होते. मात्र, नंतर एससी-एसटी कायद्याची कलमे समाविष्ट झाल्यानंतर या प्रकरणात कलम १८ लागू होत असल्याने अंतरिम संरक्षण पुढे सुरू ठेवता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
बचाव पक्षाने मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा आधार घेतला होता. मात्र, तो निर्णय भारतीय दंड संहितेअंतर्गत (IPC) असलेल्या गुन्ह्यांशी संबंधित असून एससी-एसटी कायद्याअंतर्गत नोंद झालेल्या गुन्ह्यांना लागू होत नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. त्यामुळे जे. पी. गर्ग यांचा अंतरिम संरक्षण वाढविण्याचा अर्ज फेटाळण्यात आला असून, पुढील दिलासासाठी त्यांना आता मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठवावे लागणार आहे. या आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.
वरिष्ठांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप :
प्रदीप सुखदेव जाधव (५८) हे विराज प्रोफाईल्स लिमिटेड या कंपनीत सहाय्यक उपाध्यक्ष म्हणून काही वर्षांपासून कार्यरत होते. त्यांच्या सेवा ज्येष्ठता व सेवेदरम्यान केलेल्या कामाची दखल घेऊन त्यांना बढती न दिली गेल्याने त्यांच्या वरिष्ठासोबत संघर्ष सुरू होता. याच कारणामुळे त्यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथील एका नामांकित इस्पात उद्योगामध्ये नोकरी करायला सुरुवात केली होती. मात्र उत्तर प्रदेशमध्ये कार्यरत झाल्यानंतर विराज कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक नीरज कोचर यांनी काही दिवसातच त्यांना पुन्हा तारापूर येथे बोलवून घेऊन प्रदीप जाधव यांना विराजमध्ये कार्यकारी संचालक पद देऊन तारापूर येथील काही उत्पादन केंद्रांची (युनिट) जबाबदारी सोपवली होती.
कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक नीरज कोचर, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. पी. गर्ग व राकेश नामक या वरिष्ठ अधिकार्याने कंपनीच्या मालकीच्या बंगल्यात १९ जूनच्या दुपारी प्रदीप जाधव यांना बोलावून त्यांच्यावर काही गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. हे आरोप अमान्य असल्याने तसेच आपल्याला या प्रकरणात नाहक गोवले जात असल्याचे मानून प्रदीप जाधव यांनी त्याच दिवशी संध्याकाळच्या सुमारास बोईसर पूर्व येथील आपल्या निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
