सुरक्षा व वाहतूक सुविधांअभावी ऑनलाइन वर्गांना प्राधान्य

नवी मुंबई : गेले दीड वर्ष करोनामुळे बंद असलेल्या शाळा कधी सुरू होतात याची विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्सुकता होती. त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात सुमारे ७५ टक्के उपस्थिती होती. यात वाढ होणे अपेक्षित होते, मात्र यात दहा टक्क्यांची घट झाल्याचे दिसत आहे. पालकांच्या मनात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता आहेच, शिवाय वाहतूक साधनांअभावी मुलांना शाळेत पाठविण्यास पालक कचरत असल्याचे दिसत आहे.

४ ऑक्टोबरपासून आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा शहरात सुरू करण्यात आल्या आहेत. गेले दीड वर्ष शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. मुळात शाळा सुरू करण्याचे शासनाने आदेश दिल्यानंतर पालकांमधून संमिक्ष प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

मात्र सुरक्षेबाबत शाळांना नियमावली देत शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची वाहतूक हा एक मोठा प्रश्न पालकांसमोर उभा राहिला आहे. करोनाकाळात अनेक पालक शाळेपासून राहण्यास दूर गेले आहेत. त्यांना वाहतूक साधन उपलब्ध नाही.

 शाळांना शाळेची बस किंवा खासगी वाहनांनीच मुलांना शाळेत पाठवा असे सांगितले आहे. मात्र दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळेने बस मार्ग नसल्याने किंवा त्या भागात

जास्त विद्यार्थी नसल्याने बस सेवा देण्यास नकार दिला आहे. तसेच रेल्वे प्रवासही करता येत नाही. त्यामुळे पालकांना स्वत: मुलांची ने-आण करावी लागत आहे. किंवा परिवहनच्या बस हा पर्याय आहे. मात्र परिवहनच्या बसमध्ये प्रचंड गर्दी असल्याने तसेच शाळांनी या बसमधून मुलांना शाळेत पाठवू नये असे सांगिल्याने काहींची 

गैरसोय झाली आहे. त्याचा परिणाम शाळेतील विद्यार्थी उपस्थितीवर होत आहे.

शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात महापालिका शाळेत ७० ते ७५ टक्के उपस्थिती होती तर खासगी शाळेत ५० टक्क्यांपर्यंत उपस्थिती होती. मात्र आता शाळा सुरू होऊन दोन आठवडे होत आहेत. मात्र शाळांतील उपस्थिती घटल्याचे चित्र आहे. ५ ते १० टक्के उपस्थिती कमी झाल्याचे शाळा व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

आमच्या शाळेत सुरुवातीला विद्यार्थ्यांची ७५ ते ८० टक्के उपस्थिती होती. पंरतु आता ७० टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. विद्यार्थी ऑनलाइन वर्गात येत आहेत.  – मारुती गवळी, मुख्याध्यापक, राजश्री शाहूमहाराज शाळा, रबाळे

महापालिका शाळेतील उपस्थित विद्यार्थी संख्या ७५ टक्के आहे तर खासगी शाळांमध्ये ५० टक्के आहे. महापालिकेपेक्षा खासगी शाळेतील विद्यार्थी उपस्थिती कमी आहे. – जयदीप पवार, शिक्षण अधिकारी, महापालिका

मागील आठवड्याच्या तुलनेत शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ५ ते १० टक्के घटली आहे. काही विद्यार्थी बस, रेल्वेने प्रवास करून शाळेत येत आहेत. त्यामुळे पालक मुलांना शाळेत पाठविण्याऐवजी ऑनलाइन वर्ग करण्यास सांगत आहेत. काही पालकांच्या मनात आरोग्य सुरक्षेबाबतही चिंता आहे.  – रवींद्र पाटील, शिक्षक. रा.फ, नाईक विद्यालय, कौपरखैरणे