नवी मुंबई : डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रेगाबॅलिन कॅप्सूलची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अंमली पदार्थविरोधी पथकाने (एएनसी) अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांच्या सहकार्याने खांदेश्वर येथील महादेव मेडिकल स्टोअरवर कारवाई केली. या कारवाईत मेडिकलमधून १५० प्रेगाबॅलिन कॅप्सूल जप्त करण्यात आल्या. या औषधांचा पुरवठा करणाऱ्या विशाल जाधव याच्याकडून आणखी २,०७० कॅप्सूल हस्तगत करण्यात आल्याने एकूण २,२२० कॅप्सूल जप्त करण्यात आल्या आहेत.

एएनसी पथकाला महादेव मेडिकल स्टोअरमध्ये प्रेगाबॅलिन कॅप्सूलची बेकायदा विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे एएनसीने एफडीएच्या कळंबोली विभागातील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मेडिकल स्टोअरवर छापा टाकला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. तपासणीदरम्यान प्रेगाबॅलिन कॅप्सूल डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकल्या जात असल्याचे आढळून आले. नशेसाठी या औषधांचा वापर करणाऱ्या व्यक्तींना चढ्या दराने कॅप्सूल विकल्या जात असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. कारवाईत प्रेगाबॅलिन कॅप्सूलची १५ पाकिटे जप्त करण्यात आली. प्रत्येक पाकिटात १० कॅप्सूल असल्याने मेडिकलमधून एकूण १५० कॅप्सूल हस्तगत करण्यात आल्या.

मेडिकल स्टोअरमधील तपासानंतर या औषधांचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. त्यावेळी विशाल जाधव याच्याकडून मेडिकलला प्रेगाबॅलिन कॅप्सूलचा पुरवठा होत असल्याचे समोर आले. औषधांच्या पुरवठ्यासंदर्भातील आवश्यक वैध कागदपत्रे त्याच्याकडे नसल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. जाधव याच्या ताब्यातील औषधसाठ्याची तपासणी केली असता २,०७० प्रेगाबॅलिन कॅप्सूल आढळून आल्या. हा संपूर्ण साठा जप्त करण्यात आला.

मेडिकलमधील १५० आणि जाधव याच्याकडील २,०७० अशा एकूण २,२२० कॅप्सूल या कारवाईत जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स कायदा तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत खांदेश्वर पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रेगाबॅलिन कॅप्सूलचा स्रोत, त्यांचा पुरवठा आणि विक्रीचे जाळे याबाबत तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांनी दिली.

खरेदी-विक्रीच्या नोंदीच नाहीत

महादेव मेडिकल स्टोअरमध्ये तपासणीदरम्यान प्रेगाबॅलिन कॅप्सूलच्या खरेदी-विक्रीसंदर्भातील रजिस्टरची पाहणी करण्यात आली. मात्र, या औषधांच्या खरेदी-विक्रीच्या कोणत्याही नोंदी रजिस्टरमध्ये आढळून आल्या नाहीत. त्यामुळे मेडिकलमध्ये उपलब्ध असलेल्या औषधसाठ्याची नोंद आणि त्याच्या व्यवहारांची माहितीही तपासाच्या कक्षेत आली आहे.