अलिबाग – राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत निर्माण झालेल्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक पार पडली. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची शासनाने गंभीर दखल घेत ही बैठक आयोजित केल्याने राज्यभरातील बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो शिक्षकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी, रिक्त पदांचा प्रश्न, पात्र शिक्षकांना न्याय मिळण्यात होणारा विलंब तसेच प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुलभ करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी मंगळवार, २८ जुलै २०२६ रोजी ग्रामविकास मंत्र्यांना सविस्तर निवेदन सादर केले होते. या निवेदनात बदली प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची आणि प्रलंबित प्रश्न सोडविण्याची जोरदार मागणी करण्यात आली होती.

या निवेदनाची तातडीने दखल घेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी २९ जुलै रोजी मंत्रालयात विशेष बैठक बोलावली. या बैठकीस ग्रामविकास विभागाचे सचिव, संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी तसेच शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील विविध तांत्रिक त्रुटी, रिक्त पदांची सद्यस्थिती, नवीन शिक्षक भरतीचा बदली प्रक्रियेवर होणारा परिणाम आणि प्रक्रियेत आवश्यक सुधारणा याबाबत सविस्तर मांडणी केली. यावेळी शिक्षकांना न्याय मिळेल, अशी पारदर्शक आणि सुलभ बदली प्रक्रिया राबविण्याची मागणीही करण्यात आली.

बैठकीदरम्यान ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी बदली प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी सकारात्मक पद्धतीने सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले. त्यामुळे दीर्घकाळापासून बदलीची प्रतीक्षा करणाऱ्या हजारो शिक्षकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे. या बैठकीस महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, रायगड जिल्हा कार्यवाह विजय पवार, तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांतील शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.