खासगी बसची भाडेवाढ ; प्रवाशांना भुर्दंड; अनेकांचा गावी जाण्याचा बेत रद्द

तीन दिवस सलग दिवाळी सुट्टी आल्याने कुटुंबीयांसह आपल्या गावी जाण्याचा बेत अनेकांनी आखला आहे.

(संग्रहित छायाचित्र)

नवी मुंबई : डिझेलची दरवाढ आणि वाहनांच्या सुटय़ा भागासह महागलेल्या करांचे कारण पुढे करीत खासगी वाहतूकदारांनी दिवाळीत बसच्या भाडय़ात मोठी वाढ केली आहे. नवी मुंबईतून जाणाऱ्या प्रमुख मार्गावर पूर्वीपेक्षा दुपटीहून अधिक भाडेवाढ झाली आहे. प्रवाशांना मात्र त्याचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

त्यात राज्य परिवहन सेवा कर्मचाऱ्यांचा संप अजूनही काही ठिकाणी सुरू असलेल्या एसटी बस सेवा सुरळीत झाली नाही. त्यामुळे दिवाळीसाठी गावाकडे जाणऱ्या प्रवाशांना चांगलाच भुर्दंड बसत आहे. या भाडेवाडीमुळे काहींनी तर प्रवासाचा बेतच रद्द केला आहे. विशेषत: मराठवाडा, विदर्भात जाणाऱ्या खासगी बसची मोठी भाडेवाढ झाली आहे. बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी या भागातील नोकरदार मोठय़ा संख्येने मुंबई, ठाणे, नवी मुंबई व पनवेलमध्ये वास्तव्यास आहेत.

तीन दिवस सलग दिवाळी सुट्टी आल्याने कुटुंबीयांसह आपल्या गावी जाण्याचा बेत अनेकांनी आखला आहे. यातील अनेक जण करोनामुळे गेली दीड वर्षे गावी गेलेले नाहीत.

मात्र खासगी बसचालकांनी एसटी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप व डिझेल दरवाढीचे कारण पुढे करीत मोठी भाडेवाढ केली आहे. यामुळे अनेकांची निराशा झाली आहे.

मुंबईतून दररोज ३०० ते ४०० खासगी बस प्रवासी वाहतूक करतात. यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. 

चौपट भाडे

बीड, उस्मानाबादला जाण्यासाठी नियमित एसटीला ८०० ते ९०० तिकीट असते. खासगी बसचे तिकीट १४०० पर्यंत असते. मात्र आता बीडला जाण्यासाठी एका व्यक्तीसाठी ३ ते ४ हजार तर उस्मानाबादला जाण्यासाठी अडीच ते तीन हजार भाडे घेतले जात आहे. तुळजापूर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, शेगाव, अशा तीर्थस्थळी जाण्याचे दरही एसटीच्या तुलनेत किमान चौपट झालेले आहेत.

भाडेवाढीवर नियंत्रण हवे

खासगी बस भरमसाट पैसे उकळतात. शिमगा असो की गणशोत्स नेहमीच मनमानी भाडे आकारले जाते. यावर कोणाचेही नियंत्रण कसे नाही? अशी खंत गणेश उपाध्ये या प्रवाशाने व्यक्त केली. करोनाकाळात नोकरी गेली. आता कुठे चार महिने झाले नोकरी मिळाली. कशीबशी चार दिवसांची सुट्टी मिळाली. बसभाडे पाहिले तर चार जणांसाठी चार ते पाच हजार रुपये खर्च होणार आहे. त्यामुळे गावी जाण्याचा बेत रद्द केल्याचे करुणा क्षीरसागर यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Private bus fare increase due to diesel price hike zws

ताज्या बातम्या