नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

केंद्र सरकारला गुंतवणुकीसाठी मर्यादा पडत असल्याने रोजगार निर्मितीसाठी खासगी क्षेत्रातील गुंतवणूक केल्याशिवाय पर्याय नसल्याचे मत केंद्रीय रस्ते विकास व नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांनी जेएनपीटीमधील पत्रकार परिषदेत व्यक्त केले. या वेळी गडकरींच्या हस्ते बंदरातील ११ हजार कोटींच्या विविध अकरा विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे बंदराची क्षमता वाढून नफ्यातही प्रचंड वाढ होणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली. बंदरावर आधारित पहिल्या सेझ प्रकल्पात ७५ टक्के स्थानिकांनाच रोजगार देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

बंदरातील सुधारणांसाठी एका समितीची नेमणूक करण्यात आलेली होती. त्यांनी एकूण १२० सूचना सुचविल्या होत्या. त्यातील ८५ सूचनांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे गडकरींनी स्पष्ट केले. या सुधारणांमुळे जेएनपीटी बंदरांच्या नफ्यात वाढ होणार असून पुढील आर्थिक वर्षांत जेएनपीटीला २ हजार कोटींचा नफा अपेक्षित असल्याचेही त्यांनी नमूद केले.

तसेच भविष्यात जेएनपीटी हे १ कोटी कंटेनर हाताळणी करणारे बंदर होणार आहे. त्याच प्रमाणे बंदरावर आधारी सेझमध्ये पाच हजार कोटींची गुंतवणूक झाल्यानंतर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष १ लाख रोजगार निर्माण होणार आहेत. यातील रोजगार स्थानिकांनाच देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र तयार करून जेएनपीटीकडून त्याची दक्षता घेतली जाईल अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली. या पत्रकार परिषदेत जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर तसेच पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. गडकरींनी या वेळी बंदराच्या परिसरात पुढील काळात ४५ हजार कोटींपर्यंतची गुंतवणूक करणार असल्याचे संकेत दिले.

[jwplayer 9XeVRaOr]

सागरमाला योजनेअंतर्गत प्रकल्प

केंद्र सरकारच्या सागरमाला योजने अंतर्गत देशातील बंदराचा विकास व त्यांची क्षमता वाढविण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याच एक भाग म्हणून जेएनपीटी बंदरातील जेट्टीचे मजबुतीकरण, रेल्वे मार्गाचे रुंदीकरण तसेच दुहेरी कंटेनर वाहतूक क्षमता, जासई ते जेएनपीटीदरम्यान तिसरा रेल्वे मार्ग, चौथ्या बंदरासाठी वीजनिर्मिती करणारा प्रकल्प, बंदराच्या वाय जंक्शनजवळील उड्डाण पूल, सर्व सुविधांनी युक्त असे वाहनतळ, नॉर्थ गेटजवळील उड्डाण पूल या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले.