scorecardresearch

खांदेश्वर परिसरात पाण्यासाठी वणवण

स्थानिकांच्या या गावात भाडेकरूंचा भरणा मोठय़ा प्रमाणात आहे.

khandeswar
खांदेश्वर गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे.

शहरी मतदारांच्या मतदानावर उमेदवाराचे भवितव्य

प्रभाग फेरी प्रभाग क्र. १४

धाकटा व मोठा अशी दोन्ही खांदेश्वरची गावे तसेच मूळ पनवेल शहराचा विस्तार झालेला साईनगरचा परिसर आणि पनवेल शहरातील टपाल नाका यांना जोडणारा हा प्रभाग असल्यामुळे शहरी मतदारांची टक्केवारी खांदेश्वरच्या या प्रभागातील निवडून देणाऱ्या सदस्यांचे भवितव्य ठरविणारा आहे. खांदेश्वर गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे. येथील महिलांना आजही दिवसातून दोन वेळा नळावर जाऊन पाणी भरावे लागते.

स्थानिकांच्या या गावात भाडेकरूंचा भरणा मोठय़ा प्रमाणात आहे. पाणी हा प्रभाग १४ मधील जटिल प्रश्न असून यंदा पावसाचे प्रमाण चांगले असूनही साईनगरपासून टपाल नाक्यापर्यंतच्या नागरिकांना दिवसाआड पाण्याची सवय करून घ्यावी लागली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पनवेलकरांच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोर सेक्टर २५ या परिसरात पंचतारांकित हॉटेल्स उभी राहत आहेत. खांदेश्वर ते कळंबोली हा सिडको प्रशासनाचा तिसऱ्या टप्प्यातील मेट्रो प्रकल्प याच रेल्वे स्थानकाजवळ प्रस्तावित आहे. तसेच याच परिसरात एकाच ठिकाणी शेकडो नामांकित कंपन्यांची दुकाने असणारा वातानुकूलित मॉल आणि मल्टीप्लेक्स सिनेमागृह प्रस्तावित आहे. त्यामुळे या परिसरात बडे बांधकाम व्यवसायिक गृहप्रकल्प उभारण्याच्या प्रयत्नात आहेत. सध्या येथील नागरिकांना वीटभट्टय़ांमुळे होणऱ्या प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. सुमारे ६० ते ८० लाख रुपये किमतीच्या सदनिका खरेदी करायच्या आणि खिडकीबाहेरून येणाऱ्या वीटभट्टय़ांच्या धुरात घुसमटत दिवस काढायचे अशी येथील अवस्था आहे. त्यामुळे माहापालिकेने रहिवाशांची या त्रासातून सुटका करावी, अशी मागणी होत आहे.

खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोरून सुटणारी व नवीन पनवेलला जोडणारी बससेवा रेल्वेच्या वेळेनुसार असावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. खांदेश्वर गावामध्ये पायाभूत सुविधांपैकी गावात नळयोजना व मलनिस्सारण योजना राबवणे गरजेचे असल्याचे मत अनेक ग्रामस्थ महिलांनी व्यक्त केले. गावांमधील राजकारणातील प्रस्थापित व त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरापर्यंत पायाभूत सुविधा आहेत. परंतु गावात अरुंद रस्ते व घराघरात जलवाहिनी नाही.

खांदेश्वर वसाहतीच्या प्रवेशद्वाराशेजारील उजव्या बाजूकडून न्यू होरायझन विद्यालयापर्यंतच्या परिसरातील रहिवाशांसाठी रेल्वे स्थानकाला जोडणारी थेट सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. महापालिकेने मिनी बस सुरू कराव्यात तरच येथील तीन आसनी रिक्षाचालकांच्या मुजोरीला आळा बसेल असे प्रवाशांचे म्हणणे आहे. साईनगर, बावनबंगला व किनारा सोसायटी या परिसराला सांस्कृतिक वारसा असला तरी पिण्याच्या पाण्याअभावी गेला महिनाभर येथील रहिवासी त्रस्त आहेत. राजकारणी मंडळींशी गोड बोलून सोसायटीपर्यंत टँकर आणण्याची प्रथा पनवेलमध्ये पडली आहे. यापूर्वीच्या पनवेल नगर परिषदेमध्ये सत्ताधारी म्हणतील तीच पूर्व दिशा, अशी स्थिती होती. त्यामुळे पाणीटंचाईची तक्रार आणि टँकरची मागणी याकडे नगर परिषद प्रशासन फारसे लक्ष देत नसत. त्यामुळे सामान्य नागरिक नगरसेवकाला मान देऊन मिळेल तेवढे पाणी पदरात पाडून घेत. सध्या निवडणुकीचा काळ असल्यामुळे सत्ताधाऱ्यांना शिक्षा नको म्हणून महापालिका प्रशासनाने नागरिकांना मोठय़ा प्रमाणात पाणी वाटप सुरू केले आहे. यामध्ये सामाजिक संस्थांमार्फत काही जनसेवक सोसायटय़ांमध्ये पाणीवाटप करून मतांवर ताव मारण्याचा प्रयत्न करत आहेत.

प्रभाग क्षेत्र

खांदेश्वर रेल्वे स्थानक, कामोठे सेक्टर २५, धाकटा व मोठा गाव, सेक्टर १३, कर्नाळा स्पोर्ट्स अकादमीशेजारील साईनगर, बावनबंगला परिसर, किनारा सोसायटी, पटेल मोहल्ला.

रोडरोमियांच्या त्रासामुळे महिला त्रस्त

खांदेश्वर गावातील वातावरण महिलांसाठी त्रासदायक ठरू लागले आहे. नोकरीनिमित्त ये-जा करण्यासाठी येथील महिलांना खांदेश्वर येथील एमआयडीसी कार्यालयाकडून रेल्वे रुळांलगत जाणे सोयीचे ठरते. याच मार्गावर रोज सकाळी ११पासून ते सायंकाळपर्यंत रोडरोमिओ बसतात. येणाऱ्या जाणाऱ्या महिलांची छेड काढतात. आक्षेपार्ह वेशात वावरतात. हा परिसर निर्जन असल्यामुळे येथे पोलिसांची फेरी नियमितपणे होत नाही. दुचाकीवरून येणारे हे टपोरी छेडछाड करून भरधाव निघून जातात. त्यांच्या हेल्मेटमुळे ते नेमके कोण आहेत, हे कळतही नाही. अनेक वेळा महिलांचा पदर ओढेपर्यंत या रोडरोमिओंची मजल जाते, अशी व्यथा येथील महिलांनी मांडली.

२८, ३०८  लोकसंख्या

२४,४८८  एकूण मतदार

११,४१८  स्त्री मतदार    

१३,०७०  पुरुष मतदार

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-05-2017 at 01:42 IST