एमआयडीसीबरोबर महापालिकेचा सामंजस्य करार

नवी मुंबई : ३०७ करोड रुपये खर्च करून वापरण्यायोग्य करण्यात येणारे पुनप्रक्रियाकृत पाणी आता नवी मुंबई महापालिकेला कंपन्यांना विकता येणार आहे. एमआयडीसीशी याबाबतचा करार करण्यात आला असून १८ रुपये ५० पैसे प्रतिघनमीटर दराने पाणी विकले जाणार आहे. यातून पालिकेला १५ वर्षांत ४९५ कोटींचा महसूल मिळणार आहे.

शहरात दररोज ४५० दशलक्ष लीटर सांडपाणी तयार होते. हे पाणी थेट समुद्रात सोडता येत नसल्याने महापालिकेने शहरात सात मलप्रक्रिया केंद्रे उभारली असून त्या पाण्यावर प्रक्रिया करून ते समुद्रात सोडले जाते.

मात्र केंद्र शासनाच्या ‘अमृत मिशन’ योजनेअंतर्गत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी थेट समुद्रात न सोडता त्यावर पुनर्प्रक्रिया करून ते वापरण्यायोग्य करण्यात येणार आहे. यासाठी नवी मुंबई महापालिकेने कोपरखैरणे व ऐरोली येथील मलप्रक्रिया केंद्रात प्रत्येकी २० दशलक्षलीटर क्षमतेचे प्रकल्प उभारून त्यामधील पुनर्प्रक्रियाकृत पाणी औद्योगिक वसाहतीतील कंपन्याना पुरवण्यात येणार आहे.

२०१७ च्या आदेशानुसार हे पुनर्प्रक्रियाकृत पाणी एमआयडीसीला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतच्या सामंजस्य कराराबाबतचा मसुदा महापालिकेने एमआयडीसीला दिला होता.

मार्च महिन्यात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत एमआयडीसी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यांनी याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार एमआयडीसी व नवी मुंबई महापालिका यांच्यामध्ये याबाबतचा करार करण्यात आल्याचे एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.अल्बनगन यांनी सांगितले. करारानुसार आता हे पुनर्प्रक्रियाकृत पाणी एमआयडीसी क्षेत्रात कंपन्यांना पुरवले जाणार असून एकूण ८३ किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकली जात आहे. हे काम अंतिमही अंतिम टप्प्यात आहे.

 महापालिकेच्या पुनप्र्रक्रियाकृत पाणी विक्रीतून १५ वर्षात पालिका व एमआयडीचा सामंजस्य कराराप्रमाणे पालिका १८ रुपये ५० पैसे प्रतिघनमीटर दराने पाणी विक्री करणार आहे. त्यातून पालिकेला १५ वर्षांत ४९४.५३ कोटी इतका महसूल मिळणार आहे. आतापर्यंत  एमआयडीसी कंपन्यांना २२ रुपये ५० पैसे आकारत होती. पालिका त्यांना १८.५० दराने पाणी देणार आहे.

प्रकल्प अंतिम टप्प्यात

सेक्टर १४ कोपरखैरणे येथे ८७.५० दक्षलक्ष लिटर आणि सेक्टर १८ ऐरोली येथे ८० दक्षलक्ष लिटर क्षमतेची सी टेक या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित मलप्रक्रिया केंद्रे असून त्याठिकाणी स्वच्छ होणारे सांडपाणी उद्योग समूहांच्या मागणीनुसार अधिक स्वच्छ करण्यासाठी दोन्ही ठिकाणी प्रत्येकी २० दक्षलक्ष लिटर क्षमतेचे व उच्च दर्जाचे अल्ट्रा फिल्टरेशन तंत्रज्ञान असलेले टर्शिअरी ट्रिटमेंट प्रकल्प उभारण्यात आले आहेत.  डिसेंबर २०२१ पर्यंत हे प्रकल्प कार्यान्वित होत आहेत. कोपरखैरणे येथील प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून ऐरोली येथील प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे.

एमआयडीसीच्या पाण्यात बचत

हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर सद्यस्थितीत एमआयडीसीमार्फत उद्योगांना पुरविण्यात येणाऱ्या पाण्याची बचत होणार आहे. हे बचत झालेले पिण्याचे पाणी एमआयडीसीमार्फत एमएमआरडीए क्षेत्रातील नागरिकांना उपलब्ध होणार असल्याने पाण्याची अडचण दूर होणार आहे.

पालिका व एमआयडीसीमध्ये पुनर्प्रक्रियाकृत पाणी देण्याचा करार झाला असून त्यातून पालिकेला मोठे उत्पन्न मिळणार आहे. पर्यावरणीयदृष्ट्या हा पथदर्शी प्रकल्प आहे. भविष्यात या प्रकल्पांची क्षमता वाढवली जाऊन अधिक पाणी देता येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.  -अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका