नवी मुंबई : शहरात माझी वसुंधरा अभियान राबवण्यात येत असून या अंतर्गत महापालिका प्रशासनाने स्वत: आपल्या कार्यालयांत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवत आहे. आता प्रशासनाने यात नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी गृहसंकुलांत हा प्रकल्प राबवण्याचे नियोजन केले आहे. हा प्रकल्प राबवणाऱ्या गृहसंकुलांना प्राेत्साहन म्हणून महापालिका मालमत्ता करात सवलत देण्याचा विचार करीत आहे. याचे नियोजन सुरू असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले.

नवी मुंबई महापालिका माझी वसुंधरा अभियानअंतर्गत अनेक पर्यावरणपूरक प्रकल्प राबवत आहे. यात नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी प्रशासन नियोजन करीत आहे. नागरिकांचा जलसंवर्धनात सहभाग वाढला तर पर्यावरणपूरक वातावरण निर्माण होईल या हेतून यात गृहसंकुलांचा सहभाग वाढवण्यात येणार आहे.

महापालिका प्रशासनाने या अभियानांतर्गत आपल्या कार्यालयांत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून याची कामे सुरू आहेत. घणसोली येथील महापालिका औषध भांडारगृह, महापालिका मुख्यालय, तसेच विभाग कार्यालये याठिकाणी हे प्रकल्प राबवण्यात येत आहेत. आता नागरिकांनी यात सहभागी होऊन जलसंवर्धन करावे, असे आवाहन करण्यात येत आहेत. आपल्या गृहसंकुलात हा प्रकल्प राबवल्यास प्रोत्साहन म्हणून मालमत्ता करातही सूट देण्याचा विचार प्रशासन करीत आहे.

माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत नवी मुंबई महापालिका जलसंवर्धन उपक्रम राबवीत आहे. महापालिकेच्या कार्यालयात हे उपक्रम सुरू करण्यात आलेले आहेत. यात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी ही गृहसंकुले पावसाच्या पाण्याची साठवणूक करून जलसंवर्धन करतील त्यांना मालमत्ता करात सवलत देण्याचे नियोजन सुरू आहे. पुढील आठवड्यात याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.– अभिजित बांगर, आयुक्त, महानगरपालिका