पनवेल : महापालिकेमध्ये मालमत्ता कराची पुनर्निरीक्षण मोहीम २४ जुलै ते ४ ऑगस्टपर्यंत शहरातील वासूदेव बळवंत फडके नाट्यगृहात सूरु केली. नागरिकांनी या मोहीमेत आतापर्यंत ५२,२७० हरकती नोंदविल्या. या मोहीमेला मुदतवाढ नागरिकांनी मागीतल्यानंतर पालिका प्रशासनाने प्रभाग कार्यालयात ही मोहीम अजून दोन दिवस राबवली जाईल असे जाहीर केले. सोमवार व मंगळवार पालिकेने संबंधित मोहीम प्रभाग कार्यालय ‘अ’ (खारघर) येथे सूरु केली आहे. पालिकेचे प्रशासक तथा आयुक्तांनी या मोहीमेला मुदतवाढ देताना कोणत्याही खोट्या आश्वासनाला बळी न पडता करदात्यांनी स्वता मालमत्ता कराच्या देयकामधील काही त्रुटी राहील्यास त्यामध्ये बदल करण्याची ही संधी वाया जाऊ देऊ नका, असे आवाहन सामान्य करदात्यांना केले आहे.

मागील वर्षी एप्रील ते जुलै महिन्यात ५७ कोटी रुपये मालमत्ता करातून पालिकेला मिळाले परंतु यंदा पनवेल महापालिकेने करवसूलीसाठी वेळोवेळी वर्तमानपत्रातून विविध केलेल्या आवाहन, जाहिराती आणि कर सवलतींमुळे करदात्यांनी मालमत्ता जप्तीच्या भितीपोटी एप्रील ते जुलै या ४ महिन्यात पालिकेच्या तिजोरीत कर रकमेचे १७० कोटी रुपये जमा झाले. पनवेल महापालिकेने ६ वर्षांचा मालमत्ता कर एकाच वेळी भरावा यासाठी पालिकेतील मालमत्तेंचे सर्वेक्षण करुन करदात्यांना सर्वेक्षणानूसार कराची देयके पाठविली. मात्र अनेक ठिकाणी मालमत्ता बंद असल्या तरी भाडेकरु ठेवल्याचा अधिकचा कर मालमत्तेच्या मालकाला लावण्यात आला आहे. कर लावण्यात आलेल्या अनेक त्रुटी दूर करण्यासाठी ही विशेष मोहीम पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त गणेश देशमुख यांनी हाती घेतली आहे.

हेही वाचा >>>पनवेल: प्रवासात हरवलेला फोन दोन तासांत शोधला; वाचा नेमक काय घडलं…

सोमवारपासून पालिकेने प्रभागनिहाय कराच्या देयकांमधील हरकती दुरुस्ती मोहीमेला सूरुवात केल्यावर त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. प्रभाग समिती ‘अ’ चे कार्यालय खारघर येथे असून सोमवार व मंगळवार येथे प्रभाग कार्यालयात ही मोहीम सूरु असणार आहे. तसेच प्रभाग समिती ‘ब’ कळंबोली ९ व १० ऑगस्ट, प्रभाग समिती ‘क’ कामोठे ११ व १२ ऑगस्ट व प्रभाग समिती ‘ड’ पनवेल शहरात १३ व १४ ऑगस्ट या दिवशी ही मोहीम घेतली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त गणेश शेटे यांनी दिली. आतापर्यंत १ हजार ४४३ मालमत्ता धारकांनी त्यांच्या देयकाममध्ये दुरुस्त्या करुन घेतल्या. तसेच क्षेत्रफळ व भोगवटा प्रमाणपत्रनुसार तक्रारी नागरिकांकडून मिळाल्या आहेत. ऑनलाईन कर भरण्यासाठी नागरिकांनी ‘PMC TAX APP’ www. panvelmc.org या संकेतस्थळावर जाऊन कर भरु शकतील असे आवाहन पालिकेने केले आहे.

Story img Loader