नवी मुंबईतील मालमत्ता करवसुलीतील कोटय़वधींच्या घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मालमत्ता कर विभागाचे निलंबित उपायुक्त प्रकाश कुलकर्णी यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपतविरोधी पथकाने कुलकर्णी यांच्या मालमत्तेची चौकशी सुरू केली आहे. पथकाने बुधवारी कुलकर्णी यांच्या निवासस्थानी जाऊन तपास केला.

नवी मुंबईच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी प्रथम मालमत्ता कर विभागातील गैरव्यवहाराचा मुद्दा हाती घेतला. या विभागाचे उपायुक्त प्रकाश कुलकर्णी यांना निलंबित केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली. मालमत्ता करातील ६४२ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी अखेर कुलकर्णी यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.वाशीतील एलोरा या आलिशान सोळा मजली इमारतीत कुलकर्णी राहतात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी बुधवारी उशिरापर्यंत तेथे चौकशीसाठी ठाण मांडून होते. नेरुळमधील मॉलमधील सिनेमागृहाची मालकी कुलकर्णी यांची असल्याने तेथेही या अधिकाऱ्यांनी जाऊन तपासणी केली.

नवी मुंबईतील २६१८ यूएलसी मालमत्ताधारकांना कुलकर्णी यांनी कराची देयकेच दिली नसल्याचे आढळून आले. त्यामुळे पालिकेचे ६८१ कोटींचे नुकसान झाल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण सांवत यांनी बुधवारी एनआरआय पोलीस ठाण्यात प्रकाश कुलकर्णी, दिनेश गवारी आणि किशोर ढोले या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

प्रकाश कुलकर्णी यांनी एलयूसी मालमत्तांचे कर निर्धारण करताना जाणीवपूर्वक कर निरीक्षक किंवा कर अधीक्षक यांच्याकडून कर निर्धारण न करता महापालिकेचे लेखापाल दिनेश गवारी यांच्याकडून एलयूसी मालमत्तांचे कर निर्धारण करून घेतले. करनिर्धारण करताना एलयूसी कराची संपूर्ण रक्कम भरून न घेता संबंधित मालमत्ता धारकाला आर्थिक फायदा होईल अशा पद्धतीने काही जुजबी रक्कम स्वीकारत त्या मालमत्ता धारकांना बांधकाम परवाना देण्याकरिता ना-हरकत प्रमाणपत्र दिल्याचे चौकशीत आढळून आले आहे.