समप्रमाणात पाणीपुरवठा

महपाालिकेच्या मालकीच्या धरणात मुबलक पाणी असताना शहरातील काही भागात पाणी कमी पडत आहे.

महापालिका वितरणासाठी ‘हायड्रॉलिक मॉडेलिंग’ प्रणालीचा वापर करणार; २०५०पर्यंतचा आराखडा

नवी मुंबई : महपाालिकेच्या मालकीच्या धरणात मुबलक पाणी असताना शहरातील काही भागात पाणी कमी पडत आहे, ते केवळ वितरण व्यवस्थेतील त्रुटींमुळे हे उघड झाले असून आता महापालिका प्रशासनाने यावर एक नियोजन आराखडा बनविला आहे. यात सर्वाना समप्रमाणात पाणी वाटप करण्यात येणार आहे. यासाठी ‘हायड्रॉलिक मॉडेलिंग’ प्रणालीचा वापर करण्याचे प्रशासनाने ठरविले तशा उपाययोजना सुरू केल्या आहेत. यामुळे २०५० पर्यंत शहराची पाणी समस्या सुटणार असल्याचा प्रशासनाने दावा केला आहे.

या अंतर्गत भोकरपाडा येथील प्रकल्पातील ‘एमबीआर’ची उंची वाढवणे, पनवेल रेल्वेलाइनजवळ जलवाहिनी बदलणे, पाणी वितरण व्यवस्थेसाठी आवश्यक असलेले नियंत्रण झडप बदलणे, सीबीडी सेक्टर २८ येथील पारसिकजवळील ‘एमबीआर’ पाणी उपसा यंत्रणेची कामे करण्यात येणार असून पाणीपुरवठय़ासाठी उंच टाक्या बांधण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या मालकीचे मोरबे धरण असून या धरणाची पाणी साठवण क्षमता १९०.८९० दशलक्ष घनमीटर असून या धरणातून शहराला दररोज ४५० ते ४६० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. तर एमआयडीसीकडून ८० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होता. ३० लाख लोकसंख्येला पाणीपुरवठा होईल एवढी क्षमता एकटय़ा मोरबे धरणाची आहे.

शहराच्या सध्याच्या अंदाजे लोकसंख्या १७.६० लाख आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या तुलनेत शासनाने दिलेल्या नियमानुसार शहरात अधिकचा पाणी वापर होत आहे. हा प्रकार वितरण व्यवस्थेत असलेल्या त्रुटींमुळे होत असल्याचे दिसून येते. तसेच शहराच्या काही भागात २४ तास हवे तेवढे पाणी तर काही भागात तुटवडा जाणवतो.

त्यामुळे महापालिका प्रशासनाने आपली वितरण व्यवस्था सक्षम करण्याचा निर्णय घेतला आहे. यात ‘हायड्रॉलिक मॉडेलिंग’ प्रणालीचा वापर करण्यात येणार असून सर्वाना समप्रमाणात पाणी वाटप करण्याचे नियोजन आहे. यासाठी वितरण व्यवस्थेतील असलेल्या त्रुटी दूर करण्यात येणार असून तसा आराखडा तयार केला आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा वितरणाबाबत नवीन प्रणाली राबवण्यात येत आहे. शहरात पाणीपुरवठा वितरणाबाबत सुयोग्य नियोजन व पाणीपुरवठय़ाबाबत व्यवस्थापन करण्यात येत आहे. २०५० पर्यंत पाणीपुरवठय़ाच्या नियोजनाचा आराखडा तयार करण्यात आला असून प्रत्येक विभागातील नागरिकांना समप्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे.

संजय देसाई, शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Proportional water supply ysh

ताज्या बातम्या