scorecardresearch

नवी मुंबईतील पाणथळ क्षेत्राला संरक्षण?; विमानतळ क्षेत्रासाठी पर्यावरणप्रेमींच्या शिफारसींचा समावेश

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयएएल) प्राधिकरणाने हवाई सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबईतील पाणथळींचे रक्षण करण्याकरिता बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने सुचवलेल्या शिफारसींचा समावेश केला असल्याचे संकेत विमानतळ नियंत्रित प्रकल्प प्रस्तावकाने आपल्या अहवालात दिले आहेत.

उरण : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (एनएमआयएएल) प्राधिकरणाने हवाई सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबईतील पाणथळींचे रक्षण करण्याकरिता बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने सुचवलेल्या शिफारसींचा समावेश केला असल्याचे संकेत विमानतळ नियंत्रित प्रकल्प प्रस्तावकाने आपल्या अहवालात दिले आहेत. त्यामुळे नवी मुंबई विमानतळाकडून पाणथळ क्षेत्राला संरक्षण मिळणार आहे.
नवी मुंबई विमानतळ प्रकल्पासाठी पर्यावरण आणि सीआरझेडच्या मंजुरीची मुदत नोव्हेंबर महिन्यात संपली असल्याने एनव्हायर्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंट (ईआयए) ने नव्याने अहवाल केला असून तो नवी मुंबई विमानतळ प्राधिकरणाकडून केंद्रीय हवामान, वन आणि हवामान नियंत्रण मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे.
नवी मुंबई विमानतळ परिसरातील पाणथळ क्षेत्रात सध्याच्या स्थितीत कोणताही बदल केल्यास पक्ष्यांचा अधिवास आणि भक्ष्यस्थान धोक्यात येऊ शकते. तसे झाल्यास पक्ष्यांच्या रोजच्या नैसर्गिक हालचालींवर परिणाम होऊन हवाई सुरक्षेलाही धोका निर्माण होईल,’’ असे नियंत्रित प्रकल्प प्रस्तावकाने एनव्हायर्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंट (ईआयए) ने आपल्या निरीक्षणात म्हटले आहे. त्यात बीएनएचएसकडून करण्यात आलेल्या शिफारशींचा समावेश करण्यात आल्याची माहिती नॅट कनेक्ट फाऊंडेशनचे संचालक बी.एन कुमार यांनी दिली.
जैविकदृष्टय़ा महत्त्वाच्या असलेल्या क्षेत्रांचे (पाणथळ) रक्षण आणि संवर्धन करणे ही प्रस्तावकाची जबाबदारी आहे. एनआयआय संकुल, दिल्ली पब्लिक स्कूल , चाणाक्य संस्था, पाणजे, न्हावा शेवा पोलीस स्टेशन आणि जासई या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर पक्षी आढळतात. ईआयए अभ्यास हा हैदराबाद येथील विमता लॅब्ज लिमिटेडने तयार केला असून त्यात बीएनएचएसच्या काटेकोर शिफारशींकडे लक्ष वेधण्यात आले आहे.
सेव्ह नवी मुंबई एनव्हायर्नमेंट फोरमने एनआरआय आणि चाणाक्य संस्था परसिरातील पाणथळ क्षेत्राचे परिवर्तन गोल्फ कोर्समध्ये करण्याविरुद्धची लढाई उच्च न्यायालयात जिंकली असून आता या क्षेत्राचे रक्षण होईल, असे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने अहवालात या सकारात्मक विकासाबद्दल लिहिले आहे असल्याचे फोरमचे सुनील अग्रवाल यांनी सांगितले.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Protection wetlands navi mumbai includes environmentalist recommendations airport amy