पनवेल: सिडको महामंडळाच्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र म्हणजे नैना प्रकल्प रद्द करण्यासाठी पुन्हा प्रकल्पग्रस्त एकवटणार आहेत. मागील दोन वर्षांपासून नैना प्रकल्प रद्द करण्यासाठी शेतक-यांनी विविध आंदोलने केली आहेत. १ जुलैपासून बेलापूर येथील नैना टॉवरसमोर शेतकरी प्राणांतिक उपोषण करणार आहेत. नवी मुंबई विमानतळ प्रकल्पापासून २५ किलोमीटर क्षेत्रासाठी नियोजनबद्ध बांधकामातून स्मार्ट शहर उभारणीसाठी नैना प्रकल्पाची घोषणा २०१३ साली केली. या प्रकल्पामध्ये संपादित जमिनीचा ४० टक्के विकसित भूखंड शेतक-यांना दिला जाणार आहे. हा सर्वात चांगला मोबदला असल्याचे सिडको अधिका-यांचा दावा आहे. परंतू नवी मुंबई विमानतळ प्रकल्पासाठी शेतक-यांना कोट्यावधी रुपयांचे पॅकेज दिल्याने नैनाबाधित शेतक-यांनी सुद्धा जमीनीच्या संपादनापोटी सिडकोने व राज्य सरकारने चांगले पॅकेज द्यावे किंवा युडीसीपीआर कायद्यानूसार नैना क्षेत्रातील शेतक-यांना नूकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.

शेतजमीनीसमोरील रस्ते व पायाभूत सुविधा राज्य सरकारने स्वखर्चातून उभारुन विकसित भूखंड शेतक-यांना द्यावा अशी मागणी तरुण शेतक-यांकडून होत आहे. नैना प्रकल्प जाहीर करताना शेतक-यांना विश्वासात न घेता तसेच शेतजमिनीचे भूसंपादन न करता थेट शेतक-यांच्या जमिनीवर नैनाचा प्रारुप विकास आराखडा जाहीर केल्यामुळे विमानतळ प्रकल्पाशेजारी शेतजमीनी असूनही शेतक-यांच्या जमिनीचा दर कोसळल्याने शेतक-यांना कवडीमोल भावाने जमिनी विकाव्या लागल्या. शेतक-यांची सुशिक्षित पीढी सिडकोच्या कारभाराविरोधात एकवटली असून त्यांनी गावठाण विस्तार हक्क समिती स्थापन केली आहे. मागील दोन वर्षापासून नैना प्रकल्प रद्द करण्यासाठी सिडको विरोधात या समितीसह शेकाप व महाविकास आघाडीतील राजकीय पक्ष तसेच प्रकल्पग्रस्तांच्या सामाजिक संघटना आंदोलन करत आहे. सध्या याच समितीच्या माध्यमातून शेतक-यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत १ जुलैपासून बेलापूर येथील सिडको मंडळाच्या नैना टॉवर क्रमांक १० समोर प्राणांतिक उपोषण कऱणार असल्याचे समितीचे अध्यक्ष अनिल ढवळे यांनी सांगीतले.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protest by project victims to cancel cidco corporation navi mumbai airport impact notified area naina project amy
First published on: 24-06-2024 at 15:18 IST