नवी मुंबई : महापे येथील डी मार्ट वेअर हाऊसमध्ये काम करणाऱ्या वाहनचालक मृत्यू प्रकरण चिघळले आहे. मनाई करूनही आंदोलन केल्याने बुधवारी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. यात दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मयत राजू राठोड यांच्या आईवरही पोलिसांनी लाठीमार केल्याच्या आंदोलकांनी आरोप केला असून याबाबत गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.
महापे येथील डी मार्टच्या वेअर हाऊस आवारात तुर्भे येथे राहणारे राजू राठोड यांचा फाशी घेतलेल्या अवस्थेत शुक्रवारी मृतदेह आढळून आला होता. मृतदेह मांडी घातलेल्या अवस्थेत असल्याने ही हत्या असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.
या प्रकरणी समाज समता कामगार संघटनेने गुन्हा दाखल करून योग्य तो तपास करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. तसेच मयत राजू यांच्या पत्नीला नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी करीत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. मात्र याची दखल न घेतल्याने मंगळवारी कोपरखैरणे येथील डी मार्टसमोर मयत राजू यांचे नातेवाईक आणि समता समाज कामगार संघाने आंदोलन केले. तरीही मागण्या मान्य होत नसल्याने बुधवारीही या ठिकाणी आंदोलक जमा झाले होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेनेही पाठिंबा दिला होता. पोलिसांनी डी मार्ट बंद करून कायदा हाती घेऊ नका अशी विनंती आंदोलकांना केली. मात्र आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार करीत आंदोलकांना पांगवले. या लाठीमारात दोन युवकांच्या डोक्यावर गंभीर जखम झाली आहे. शिवाय मयत राजू यांच्या आईवर लाठीमार केल्याचा आंदालकांचा आरोप आहे. याचा आम्ही निषेध करतो असे समता समाज कामगार संघाचे अध्यक्ष मंगेश लाड यांनी सांगितले. या प्रकरणी आता थेट गृहमंत्री यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले. डी मार्ट प्रशासनाने याबाबत बोलण्यास नकार दिला आहे.