पब, बार पहाटेपर्यंत सुरूच

शहरातील करोना रुग्णसंख्या ५० पेक्षा कमी झाल्यानंतर पालिकेचे रात्रीचे पथक कारवाई करीत नसल्याचे लक्षात येतात शहरातील पब, बार हे पहाटेपर्यंत सुरू राहत आहेत.

महापालिकेचे पथक अकरानंतर ‘झोपी’

नवी मुंबई : शहरातील करोना रुग्णसंख्या ५० पेक्षा कमी झाल्यानंतर पालिकेचे रात्रीचे पथक कारवाई करीत नसल्याचे लक्षात येतात शहरातील पब, बार हे पहाटेपर्यंत सुरू राहत आहेत. बेलापूर येथील एका बारमधील चित्रण समाजमाध्यमावर प्रसारित झाल्यानंतर ही बाब समोर आली असली तरी बहुतांश बार व पब सुरू राहत असून या ठिकाणी करोना नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे.

हा प्रकार उघड झाल्यानंतरही महापालिका व पोलीस पथकाने कोणत्या बारवर मोठी कारवाई केल्याचे समोर आले नाही, त्यामुळे पालिकेचे पथक रात्री दहानंतर झोपी जाते का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

करोना प्रतिबंधक नियमांची सर्वाधिक पायमल्ली बार, व पबमध्ये होताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे वेळेचे बंधनही अनेक ठिकाणी पाळले जात नाही. काही माजी लोकप्रतिनिधींनीही समाजमाध्यमांवर थेट डान्स बारमधील चित्रण प्रसारित करीत महापालिका प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. सीबीडीमधील धमाका नावाने ही चित्रफीत प्रसारित होत आहे. यामुळे महापालिका प्रशासन झोपेतून जागे झाले आहे. या चित्रफितीवरून महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याचे समजते. मात्र प्रत्यक्षात कुठे कारवाई झाल्याचे एकिवात नाही. मुळात कारवाई होत नाही. झाली तरी किरकोळ कारवाई केली जाते असे महापालिकेतीलच एका अधिकाऱ्याने सांगितले. संपूर्ण करोना काळात शहरातील तीन बार सील करण्यात आले आहेत. यातील वाशीतील अटलांटा बारवर सार्वाधिक वेळा कारवाई झाली आहे. महापालिका निर्बंध तोडल्यास २५ हजारांपर्यंत दंड आकारते. पण आमचा दोन तासांचा धंदा २५ हजार असतो, त्यामुळे दंड रकमेचे मालकांना काही वाटत नाही असे वाशीतील एका डान्स बारमध्ये वेटरचे काम करणाऱ्याने सांगितले.

नवी मुंबई महापालिकेचे पथक केवळ रात्री साडेअकरापर्यंतच ‘ऑन डय़ुटी’ असते. करोना संख्या आटोक्यात आल्यानंतर पथक शहरात कुठे दिसत नाही. वास्तविक महापालिकेने रात्रीच्या पथकात वाढ करणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

धमाका पब विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करोना नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात माहिती मिळताच कारवाई केली जाते तसेच महापालिका पथकालाही सुरक्षा देण्यात येते.

-सुरेश मेंगडे, उपायुक्त, पोलीस

रात्रीच्या गस्त पथकाची वेळ आता साडेअकराऐवजी दीडपर्यंत करण्यात आली आहे. पथकातही वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे बार व पबवर कारवाई करण्यात येईल.

– योगेश कोंडुसकर, उपायुक्त, महापालिका

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pub bar open till morning navi mumbai corona patients ssh

ताज्या बातम्या