जागेच्या मालकीवरून स्वच्छतागृह जमीनदोस्त

शीव-पनवेल महामार्गाच्या काँक्रीटीकरणानंतर २३ किलोमीटर अंतराच्या टप्प्यात उभारलेल्या पाच स्वच्छतागृहांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एका जागेच्या मालकीवरून शौचालय पाडण्याची वेळ टोल वसुली कंपनीवर आली आहे. महामार्गावर वाशीजवळील शौचालयात काही दिवसांपासून वीज नव्हती. रविवारी वीजपुरवठा कसाबसा पूर्ण करण्यात आला. ही पुरवठा व्यवस्था तात्पुरती असल्याचे सांगण्यात आले; मात्र जमिनीची मालकी वाद कायम आहे. या साऱ्या प्रकारात प्रवाशांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.

बेलापूर ते वाशीदरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून तीन वर्षांपूर्वी शीव-पनवेल महामार्ग रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण करण्यात आले. यासाठी सुमारे एक हजार २०० कोटी खर्च आला. मानखुर्द ते कळंबोली दरम्यानच्या २३ किलोमीटर रस्त्याचे काँक्रीटीकरण झाले आहे. यात उड्डाणपुलांवर काही टप्प्यात तांत्रिक कारणास्तव डांबरीकरण करण्यात आले. या महामार्गाची पुनर्बाधणी करताना बांधकाम कंपनीला वाशी, खारघर, कामोठे, कळंबोली आणि कोकण वळण या ठिकाणी पाच स्वच्छतागृहे बांधण्यात आली होती. त्याचा खर्च या बांधकामात समाविष्ट करण्यात आला. स्वच्छतागृहांची व्यवस्था पाहणे बंधनकारक असल्याने ‘सायन-पनवेल टोलवेज कंपनी’ने खारघर आणि कामोठे येथे दोन शौचालयांची व्यवस्था केली आहे. याशिवाय गर्दीच्या ठिकाणी शौचालय बांधण्यास सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे कंपनीने आणखी तीन शौचालये बांधली. त्यातील कोकण वळणावरील एक शौचालय रस्ते विकास प्राधिकरणाने आक्षेप घेतल्याने पाडण्यात आले.

करारनाम्याशिवाय वीज नाही

महामार्गावर ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्यासाठी आणखी पाच शौचालयांची आवश्यकता आहे. या मार्गावरील सर्व संपादित जमीन रस्ते विकास महामंडळाची असल्याने त्यांची परवानगी आवश्यक आहे. वाशी प्लाझा संकुलाजवळील सार्वजनिक शौचालयाची वीज जोडणी नसल्याने दुरवस्था झाली होती. त्या ठिकाणी आता तात्पुरती जोडणी देण्यात आली आहे, मात्र या जमिनींच्या करारनाम्यांची विद्युत वितरण विभाग मागणी करीत असल्याने कंपनीची अडचण निर्माण झालेली आहे. टोलकंपनीने दोन टोलनाक्यांवर कंटेनरमध्ये शौचालय सुरू केली आहेत. दरम्यान ठाणे बेलापूर मार्गावर पालिकेच्या वतीने ठेवण्यात आलेल्या ई टॉयलेटची दुरवस्था झाली असून विद्युत जोडणी, शुल्क पेटी, अस्वच्छता या कारणांमुळे ही शौचालये केवळ नावापुरती उभी आहेत.