नवी मुंबई : रबाळे एमआयडीसीतील भीमनगर परिसरात, भूषण हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या एका कंपनीला रविवारी सकाळी भीषण आग लागली. सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच रबाळे एमआयडीसी, कोपरखैरणे आणि ऐरोली अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले असून, सध्या घटनास्थळी कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रबाळे अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्याची माहिती मिळताच रबाळे एमआयडीसी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. त्यानंतर कोपरखैरणे आणि ऐरोली अग्निशमन केंद्राची प्रत्येकी एक गाडीही मदतीसाठी दाखल झाली. एकूण सहा गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सदर कंपनीमध्ये गादीसाठी फोम बनविण्याचे काम केले जाते. त्यामुळे कंपनीत फोमसह अन्य ज्वलनशील साहित्य असल्याने आग भडकण्याची शक्यता होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने पाण्याचा मारा सुरू करत आगीचा परिसरातील अन्य भागात फैलाव होऊ नये यासाठी प्रयत्न केले. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
आग आटोक्यात आली असली तरी कंपनीतील साहित्यामध्ये पुन्हा आग भडकण्याची शक्यता असल्याने अग्निशमन दलाकडून कुलिंग ऑपरेशन सुरू ठेवण्यात आले आहे. कंपनीतील जळालेल्या साहित्यामुळे मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण झाला होता. त्यामुळे परिसरात काही काळ धुराचे लोट दिसून येत होते.रविवार असल्याने कंपनीत कामगारांची उपस्थिती नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी कंपनीतील फोम आणि अन्य साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग पूर्णपणे विझल्यानंतर नुकसानीचा नेमका अंदाज येणार असून, आगीच्या कारणाचा तपास संबंधित यंत्रणांकडून केला जात आहे.
