नवी मुंबई : पायी चालणाऱ्या महिलांना लक्ष्य करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला रबाळे पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही धडक कारवाई करण्यात आली असून, यामुळे रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल तीन गंभीर गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. अमित दयाराम गौड असे अटक करण्यात आलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.
ऐरोली येथील सेक्टर ३ मध्ये राहणाऱ्या प्रज्ञा गुरुनाथ विचारे (वय ४५) या १ मे रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास पायी घरी जात असताना ही घटना घडली होती. ऐरोली परिसरातील कॉलनी रोडवर आरोपीने त्यांना पाठीमागून जोरात धक्का दिला, ज्यामध्ये प्रज्ञा विचारे जखमी झाल्या. याच संधीचा फायदा उठवत आरोपीने त्यांच्या गळ्यातील सुमारे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. या धक्कादायक प्रकारानंतर रबाळे पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ तपास सुरू केला. पथकाने घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज बारकाईने तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताचा माग काढत असतानाच, गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या अचूक माहितीनुसार पोलिसांनी कळवा परिसरात सापळा रचून अमित गौडला ताब्यात घेतले.
पोलीस कोठडीत घेतलेल्या सखोल चौकशीदरम्यान आरोपीने या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चौकशी केली असता रबाळे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आणखी दोन चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांचाही छडा लागला आहे, ज्यामध्ये २०२० आणि २०२६ मधील दोन स्वतंत्र गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपीकडून एकूण १ लाख ६५ हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (१२ ग्रॅम आणि ३ ग्रॅमचे दोन मंगळसूत्र) जप्त केले आहेत. रबाळे पोलिसांनी अल्पावधीत केलेल्या या धडक कामगिरीमुळे ऐरोली-रबाळे परिसरातील महिला व नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
