नवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावरील रबाळे परिसरात एमएमआरडीएकडून सुरू असलेल्या पुलाच्या कामानिमित्ताने आज, २७ मेपासून रात्रीच्या वेळेत वाहतुकीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. भारत बिजली आणि सिमेन्स कंपनी परिसरात पुलावर गर्डर बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार असून, २७ मे रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते ४ जून रोजी पहाटे ६ वाजेपर्यंत दररोज रात्री वाहतूक वळविण्यात येणार आहे. या कालावधीत ठाणे-बेलापूर मार्गावरील काही भाग तात्पुरते बंद ठेवण्यात येणार असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

रबाळे परिसरातील पुलाच्या कामासाठी सलग १४ रात्री गर्डर बसविण्याचे काम सुरू राहणार आहे. या कामादरम्यान मोठ्या यंत्रसामग्रीचा वापर होणार असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीत बदल करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. रात्रीच्या वेळी ठाणे-बेलापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होत असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

ठाण्याकडून बेलापूरकडे जाणाऱ्या सहा चाकी आणि त्यावरील अवजड वाहनांना मुकंद कंपनी येथून एमआयडीसीतील आतील रस्त्यांवर वळविण्यात येणार आहे. तसेच चारचाकी वाहनांसाठी भारत बिजली चौकातून फायर ब्रिगेड चौक आणि तेथून खेडेकर चौक मार्गे पुढे जाण्याचा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

बेलापूरकडून ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठीही वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. रबाळे नाका सिग्नल येथून वाहनांना उजवीकडे वळवून एमआयडीसीच्या आतील रस्त्यांद्वारे मुकंद कंपनीमार्गे पुढे सोडण्यात येणार आहे. पटणी मार्गाने ठाण्याकडे जाणाऱ्या वाहनांना रबाळे नाका, दिवागाव सर्कल आणि टी-पॉइंटमार्गे पुढे जाण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या कामामुळे रात्रीच्या वेळेत ठाणे-बेलापूर मार्गासह रबाळे, महापे आणि घणसोली परिसरात वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः एमआयडीसीतील अंतर्गत रस्त्यांवर अवजड वाहनांची संख्या वाढणार असल्याने वाहनचालकांना अतिरिक्त प्रवास वेळ लागू शकतो. विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रात्री बाहेर पडणाऱ्यांनी वेळेचे नियोजन करूनच प्रवास करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शक्य असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्लाही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.