लष्करी अधिकाऱ्यांची वसाहत म्हणजे कडक शिस्त, हे गृहीतच धरले जाते, मात्र खारघर येथील ‘रघुनाथ विहार’ या लष्करी वसाहतीतील चित्र वेगळे आहे. येथे लष्करी शिस्त पाळताना विनयशीलताही जपलेली दिसते.

रघुनाथ विहार, आर्मी कॉम्प्लेक्स, खारघर

खारघर येथे १० एकरांवर वसलेले रघुनाथ विहार आर्मी कॉम्प्लेक्स हे लष्करी अधिकाऱ्यांचे सेवा निवासी संकुल आहे. रघुनाथ विहार लष्कर वेल्फेअर सोसायटीने सैन्यदल कल्याण गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून २००३ साली हे संकुल स्थापन केले, मात्र या सोसायटीमध्ये लष्करी अधिकाऱ्यांव्यतिरिक्त इतर नागरिकही राहतात. येथे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे अधिकारी असल्यामुळे संपूर्ण भारताचे प्रतिबिंब दिसते. सोसायटीत ५३४ सदनिका आहेत. आवारात  ३३० मीटरचा जॉगिंग ट्रॅक आहे.

सोसायटीत राहणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांनी मुलांच्या विकासाला प्राधान्य दिल्याचे तेथील सुविधांवरून स्पष्ट होते. संकुलातील कोणत्याही खुल्या जागेत खेळण्यासाठी किंवा अभ्यास करण्यास मुलांना मज्जाव नाही. शालेय विद्यार्थी इथे नेहमीच एकत्र बसून अभ्यास करतात. आपले संकुल अधिक सुंदर व्हावे यासाठी कोणीही काही सूचना केल्यास त्या सत्यात उतरविल्या जातात. वृक्षांना सूर्यप्रकाशाबरोबर पाणीही वेळेवर मिळणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन झाडांना पाणी घालण्याची एक आगळी-वेगळी कल्पना मुलांना सुचली. पाण्याने भरलेली बाटली झाडाच्या खोडाला उलटी बांधून त्यातून थेंबा-थेंबाने पाणी पुरविण्यात येऊ लागले. त्यामुळे झाडे सदैव टवटवीत दिसतात. येथील महिला आणि मुलांनी आवारातील भिंतींवर वारली चित्रे रेखाटली आहेत. यापुढेही असे उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे येथील सदस्य सांगतात.

मुलांचे सामान्य ज्ञान जाणून घेण्यासाठी अनेक संकुलांत स्पर्धा घेतल्या जातात, मात्र येथील मोठय़ांचा या स्पर्धाविषयी वेगळा दृष्टिकोन आहे. आपण आपल्या देशाला किती ओळखतो हे जाणून घेण्याची वृत्ती मुलांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. नवरात्री आणि गणेशोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. नवरात्रीत विविध भागांतील रहिवाशांना त्यांच्या पद्धतीने पूजा करण्यास प्रोत्साहन दिले जाते. गणेशोत्सवात गरजूंना अन्नदान केले जाते.

या संकुलात टाकाऊपासून टिकाऊ  वस्तू निर्माण करण्यावर भर दिला जातो. सोसायटीच्या आवारात बोरवेल खोदण्यात आली होती, मात्र आता त्यात पाणी नाही, त्यामुळे बोरवेलमध्ये इमारतीच्या छतावर पडणारे पाणी सोडून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नवी मुंबईत ओला आणि सुका कचरा वेगळा केला जातो, तसे पनवेल तालुक्यात अद्याप सुरू झालेले नाही, मात्र या संकुलात ओला आणि सुका कचरा वेगळा करून ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत.

पर्यावरणपूरक वातावरण

सोसायटीच्या आवारात अनेक प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. मात्र औषधी वनस्पतींच्या लागवडीला जास्त महत्त्व दिले आहे. सब्जा, तुळस, कोरफड, निंब, शेवगा, गिलोई, ब्राह्मी अशा अनेक औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. संकुलाच्या आवारात सेंद्रिय खत तयार केले जाते.

सामाजिक भान

गेली सहा वर्षे सोसायटीतील लहान मुले सर्वाकडून एक वाटी तांदूळ गोळा करतात आणि ‘जीवन ज्योती आश्रमा’ला देतात. महिला जुने-नवे कपडे गोळा करून गरजूंना देतात. काही सदस्य नित्यनियमाने खारघर हिलवरील वृक्षांना पाणी घालतात. संकुलात पक्ष्यांसाठी अनुकूल वातावरण आहे. तिथे जांभळा सूर्य पक्षी, बुलबुल, मैना, पोपट आणि अन्य स्थलांतरित पक्षीही येतात.