नवी मुंबई– नवी मुंबई शहरात दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणरायांचे  अनंत चतुर्दशी होणाऱ्या विसर्जनावर पावसाचे सावट असून दुसरीकडे पालिकेने विसर्जनासाठी चोख व्यवस्था केली असून करोनानंतर होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव सोहळ्यासाठी वाशी शिवाजी चौक येथे गणरायांवर पुष्पवृष्टी करण्याची तयारी केली असून वाशी तसेच कोपरखैरणे येथे मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी क्रेनची व्यस्था करण्यात आली असून नवी मुंबई पालिकेच्यावतीने  विसर्जन सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

शहरात ३१ ऑगस्टपासून अत्यंत उत्साहात  व आनंदात संपन्न होत असलेल्या श्रीगणेशोत्सवातील दीड, पाच, गौरीसह सहाव्या व सातव्या दिवसाचे श्रीमूर्ती विसर्जन  पालिकेच्यावतीने अत्यंत सुव्यवस्थित रितीने संपन्न झाले आहे. त्यामुळे अनंत चतुर्दशीला होणाऱ्या विसर्जनसोहळ्याचीही पालिकेने जय्यत तयारी केली आहे.

नवी मुंबई महापालिकेच्यावतीने  २२ पारंपारिक नैसर्गिक व १३४ कृत्रिम विसर्जन स्थळांवर  सुयोग्य व्यवस्था करण्यात आली आहे.  अनंत चतुर्दशीदिनी सार्वजनिक श्रीगणेशोत्सवातील मोठ्या मुर्तींचे विसर्जन होत असल्याने महापालिका क्षेत्रातील सर्व १५६ विसर्जन स्थळांवर  अत्यंत आनंदात व उत्साहात व विनाविघ्न विसर्जन करण्यासाठी पालिका सज्ज आहे. २२ विसर्जन स्थळांवर प्रत्येक  विभाग कार्यालयांच्या माध्यमातून स्वयंसेवक, लाईफगार्ड्स व्यवस्था अधिक कृतिशीलपणे कार्यरत असणार आहे. त्यासोबतच अग्निशमन दलाचे जवान कार्यरत असणार आहेत. पोलीस यंत्रणेचेही विसर्जन स्थळावरील कायदा व सुव्यवस्थेकडे बारकाईने लक्ष  ठेवले जाणार आहे.तर २२ विसर्जन स्थळांवर नागरिकांच्या सुरक्षा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने सी.सी.टी.व्ही. यंत्रणा लावण्यात आली असून याव्दारे गर्दीवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे.

श्रीमूर्ती विसर्जनाकरीता सर्व नैसर्गिक विसर्जन स्थळी तराफ्यांची तसेच मोठ्या मूर्ती असतात अशा ठिकाणी फोर्कलिफ्ट ,अर्थात क्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनस्थळांवर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सुरक्षेसाठी बांबुचे बॅरेकेटींग करण्यात आले आहे. तसेच विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्यासह प्रथमोपचार वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून भक्तजनांना व्यवस्थितरित्या श्रीमूर्तींची निरोपाची आरती व पूजा करण्यासाठी रांगेत टेबलची मांडणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विसर्जनस्थळांवर नागरिकांमार्फत श्रीमुर्तींसोबत आणले जाणारे पुष्पमाळा, फुले, दुर्वा, यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोगे “ओले निर्माल्य”  व सुके निर्माल्य  स्वतंत्रपणे ठेवलेल्या निर्माल्य कलशातच टाकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.निर्माल्याची वाहतुक करण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली असून हे निर्माल्य महानगरपालिकेच्या तुर्भे प्रकल्पस्थळी विशेष वाहनाव्दारे वाहून नेले जाणार आहे, श्रीमुर्तींसोबत आणली जाणारी फळे व खाद्य वस्तू भाविक स्वतंत्र कॅरेटमध्ये ठेवत असून त्यांचे नंतर गरजू मुलांना व नागरिकांना वितरण करण्यात येणार आहेत.

नवी मुंबई महापालिकेच्यावतीने विसर्जन सोहळा सुव्यवस्थितपणे संपन्न होण्यासाठी योग्य ती सुविधा करण्यात आली असून वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये श्रीगणेशविसर्जन सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन सुयोग्य व्यवस्था करण्यात आली  आहे. वाशी येथे मोठ्या मंचावरून विसर्जनस्थळाकडे प्रस्थान करणा-या श्रीगणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

 सुजाता ढोले,अतिरिक्त आयुक्त ,नवी मुंबई महापालिका.

बाप्पा विसर्जनासाठी पावसाला विश्रांती दे….

मागील दोन दिवसापासून दुपारनंतर सुरु होणाऱ्या जोरदार पावासामुळे अनंत चतुर्दशी दिनी होणाऱ्या विसर्जन सोहळ्यावर पावसाचे संकट असून  शुक्रवारी होणाऱ्या विसर्जनसोहळ्यादिनी पावसांची उसंत मिळण्याची अपेक्षा गणेशभक्तांकडून करण्यात येत आहे.

पावसामुळे गणपती पुढील सत्यनारायण पूजाना अडथळा

गणेशोत्सवात सार्वजनिक व घरगुती गणरायांचे विसर्जन होण्याआधी गुरवारी अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये तसेच घरगुती गणरायंच्या ठिकाणी सत्यनारायण पुजेचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते. परंतू जोरदार पावसामुळे  अनेक ठिकाणी या पुजांर पावसांमुळे अडथळा निर्माण झाल्याचे चित्र होते.