नवी मुंबई : कॉक्रोच जनता पार्टीला आंदोलन करण्याचा अधिकार आहे; मात्र या पक्षाची स्थापना अमेरिकेत झाली असल्याने अभिजीत दिपके यांनी अमेरिकेतच आंदोलन करावे, अशी उपरोधिक टीका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. आंदोलन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अन्य नेत्यांविरोधात शिवराळ अथवा आक्षेपार्ह भाषा वापरणे टाळावे, असा सल्लाही त्यांनी दिपके यांना दिला. याचवेळी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मोर्चावरही त्यांनी टीका केली. शनिवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ६९ व्या वर्धापनदिनानिमित्त नवी मुंबईत आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना आठवले यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर आपले मत मांडले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीवर टीका केली. सर्व पक्षांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, प्रत्येक प्रश्नावर राजीनाम्याची मागणी करणे आणि त्यासाठी आंदोलन करणे योग्य नाही, असे ते म्हणाले. अभिजीत दिपके यांचा पूर्वी अरविंद केजरीवाल यांच्या सोशल मीडिया टीमशी संबंध होता, असा दावा आठवले यांनी केला. त्यामुळे त्यांनी कॉक्रोच जनता पार्टी बरखास्त करून आम आदमी पक्षात प्रवेश करावा, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला. आंदोलन करणे हा त्यांचा अधिकार असला तरी पक्ष चालविताना शिवराळ आणि आक्षेपार्ह भाषा वापरणे टाळले पाहिजे, असे आठवले म्हणाले.
यापूर्वी विविध आंदोलनांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले असून आपण स्वतःही आंदोलन करून तुरुंगवास भोगल्याची आठवण आठवले यांनी करून दिली. मात्र, आंदोलनाची मर्यादा ओलांडू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याऐवजी निवडणूक प्रक्रियेत सुधारणा आणि मतदारयादीतून वगळण्यात आलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
ठाकरे बंधूंच्या मोर्चावरही टीका
रविवारी आझाद मैदानावर निघणाऱ्या राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मोर्चाबाबतही आठवले यांनी भाष्य केले. उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्येच भाजप आणि रिपब्लिकन पक्षासोबत राहून सत्तेत सहभागी व्हायला हवे होते. मात्र, त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेची राजकीय स्थिती बदलली, असा दावा आठवले यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन राजकीय समीकरणांमध्ये भाजपसोबत राहण्याऐवजी वेगळी भूमिका घेतल्याने आता त्यांच्यावर मोर्चे काढण्याची वेळ आल्याचे आठवले म्हणाले. मात्र, लोकशाहीमध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, हेही त्यांनी स्पष्ट केले.
राज ठाकरे पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन करीत होते. उद्धव ठाकरेदेखील पूर्वी मोदी यांच्याबाबत सकारात्मक बोलत होते. आता दोघेही मोदींच्या विरोधात भूमिका मांडत आहेत. राजकीय भूमिका बदलणे आणि आंदोलन करणे हा त्यांचा अधिकार आहे, असे आठवले म्हणाले. उद्धव ठाकरे हे आजही आपले मित्र असल्याचे सांगत त्यांच्यावर अन्याय व्हावा, अशी आपली भूमिका नसल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले. मात्र, राजकीय मतभेद असले तरी लोकशाही मार्गाने आंदोलन करणे आणि आपली भूमिका मांडणे हा प्रत्येक पक्षाचा अधिकार असल्याचे त्यांनी नमूद केले.
