उरण : स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय सागरी दुर्घटनेत सर्वात मोठी म्हणून रामदास बोट दुर्घटना ओळखली जाते. या दुर्घटनेला १७ जुलै २०२६ ला ७९ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र अलिबाग व उरण समुद्र किनाऱ्याच्या मध्यभागी असलेल्या काशाच्या खडक येथे घडलेल्या अपघातामुळे आजही या घटनेच्या आठवण काढल्यानंतर थरकाप होतो. या बोट अपघातात ८०० प्रवाशांपैकी सातशेपेक्षा अधिक प्रवाशांना या दुर्घटनेत जलसमाधी मिळाली होती.

१७ जुलै १९४७ म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्याहिनाभर आधी ही अपघाताची घटना घडली. रायगड जिल्ह्यातील खारेपाटात आजही रामदास बोट दुर्घटनेच्या आठवणींनेे दुर्घटनाग्रस्त-आप्तजन परिसर भयभीत होऊन जातो. त्याकाळी मुंबई-गोवा सागरी मार्गावर धावणारी ही रामदास बोट, आठवड्यात शनिवारी मुंबई -रेवस फेरी करायाची. त्यामुळे या बोटीला नवरी बोट असेही या भागात म्हणायचे. या बोटीच्या अपघातानंतर या घटनेची भयाण माहीती देणारी अनेक गीते आणि कादंबऱ्या लिहल्या गेल्या आहेत. १७९ फूट लांब, २९ फूट रुंद व ४०६ टन वजनाची ही बोट. एक हजारपेक्षा प्रवासी वाहण्याची क्षमता असलेले हे जहाज बिट्रिश नौदलासाठी सैन्याची ने-आण करण्यासाठी बांधलेले. परंतु दुसरे युद्ध समाप्तीमुळे १९४२ मध्ये ब्रिटिश सरकारकडून भारतातील बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनीने कोकण किनापरपट्टीवर प्रवासाठी विकत घेतली होती.

तसे पाहिल्यास एखाद्या रूटची प्रवाशांना नेहमीच सवय असते. अशीच स्थिती त्याकाळी रामदास बोट प्रवाशांमध्ये होती. रेवस, सासवने आदी खारेपाट परिसरातील भूमिपुत्र भाजीपाला मुंबईला घेऊन येत व विक्रीनंतर दुसर्‍या दिवशी सकाळी या बोटीने घरी जात. तो दिवस दीपपूजा अर्थात गटारी अमावस्येचा. या सणाला खारपाटात अनन्यसाधारण महत्त्व. त्यामुळे मुंबईतील चाकरमानी न विसरता या सणास हजेरी लावत.

बोट सकाळी ८ वाजता सुटली. गटारी अमावस्येमुळे नेहमीपेक्षा प्रवासी संख्या अधिक होती. त्या दिवशी पावसाची रिपरिप सुरू होती. तसेच लाटांचे फवारे संरक्षणासाठी बोट दोन्ही बाजूनी ताडपत्र्यांनी शाकारली होती. नेहमीचे प्रवासी. गप्पागोष्टी करीत स्थिरावत होते अन बोट अरबी समुद्राच्या कवेत शिरू लागली अन पाऊस सरीही झाकोळल्या जाऊ लागल्या, ताडंवी लाटा अन काळ्या ढगांच्या वादळी छायेनं परिसर प्रलंयकारी होऊ लागला.बोट पूर्ण वेगाने काशाच्या खडकाचा ट्रँगल भेदण्याच्या पवित्र्यात, परंतु राक्षसी तांडवी लाटांनी बोट बाहुलीसारखी डोलू लागली. त्यामुळे बोट पुढे-मागे जाऊ शकत नव्हती हे कप्तानने जाणले, सैरभर प्रवांशांना समजवण्याचा प्रयत्न झाला, परंतु तांडवी लाटांनी ते प्रवासी बेहाल झाले, स्वप्नांवर मळभ दाटून आले, राक्षसी लाटा, जोरदार वार्‍यांनी बोट चक्रवातात अडकली.

अमावस्या-पौर्णिमेला-सागरात उधाणी लाटांचा बोलबाला असतो. त्या दिवशी बोटीच्या कप्तानने दोन दिवस वादळीवार्‍यात कशीबशी बोट आणतोय अशी माहिती कंपनी अधिकार्‍यांना दिली होती परंतु उद्याचे उद्या बघू असे उत्तर त्यास दिले. त्याच दिवशी रेवस धक्क्यावर कोळीबांधव मुंबईला मच्छी घेऊन जाण्यास सज्ज होते परंतु धक्क्यापासू दोन मैलावर जाताच आसमंत प्रलयी वादळाने झाकोळला होता, हे पाहताच त्यानी पडाव तसेच रेवस धक्क्यावर आणले नंतर सकाळी ९.३० वाजता पुन्हा पडाव मुंबईस घेऊन निघाले. आणि काशाच्या खडकाजवळ जाताच तरंगणारी मृतदेह जीवाच्या आकांतानेे पोहत असलेले प्रवासी पाहून त्याना रामदास बोट दुर्घटनेचा माहिती मिळाली त्यानी पडावातील मच्छी समुद्रात टाकून जवजवळ ७५ जणांना वाचवले व दुपारी १ वाजता रेवसला घेऊन धक्क्यावर ही माहिती दिली. नंतर तारेने कंपनीला मुंबईत सायंकाळी ६ ही माहिती दिली.