वजन कमी करण्याचा दावा करून व्यायाम शिकविण्याच्या बहाण्याने एका उद्योजक महिलेवर तीन वर्षे बलात्कार करणाऱ्या प्रशिक्षकाविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक ममता डिसुझा यांनी याप्रकरणी माहिती दिली. आनंद सिंग असे फरारी असलेल्या व्यायाम प्रशिक्षकाचे नाव आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. सिंग याने पीडित महिलेकडून दोन लाख रुपये उकळले आणि तो हरयाणा येथील त्याच्या मूळ गावी पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कामोठे येथील सेक्टर २१ मध्ये ही अत्याधुनिक आणि वातानुकूलित व्यायामशाळा आहे. तेथे आनंद पीडित महिलेला प्रशिक्षण देत होता; मात्र याच काळात त्याने महिलेशी जवळीक साधत तिच्यावर अनेकदा बलात्कार केला.
पोलिसांनी आनंद याला अटक करण्यासाठी एक पथक तयार केले असून त्याची ओळख सिद्ध करणारा एकही पुरावा अद्याप पोलिसांना न सापडल्याने आनंद सध्या मोकाट आहे. या घटनेनंतर कामोठे तसेच परिसरातील व्यायामशाळांमधून भरती करण्यात येणाऱ्या प्रशिक्षकांच्या चारित्र्याची माहिती आणि इतर पाश्र्वभूमी पडताळूनच त्याला रुजू करावे, अशी मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे.