नवी मुंबई मेट्रो वेगवान ; ‘आरडीएसओ’कडून प्रमाणपत्र; आता सुरक्षा तपासणी

या दरम्यान वेगवेगळ्या वजनाचा भार वाहून नेण्याची मेट्रोची क्षमता आणि इमर्जन्सी ब्रेक यांची चाचणी घेण्यात आली.

नवी मुंबई : गेली अनेक वर्षे रखडलेला नवी मुंबई मेट्रो प्रकल्प अंतिम टप्प्यात असून यासाठीच्या आवश्यक तपासण्या करण्यात येत आहेत. रिसर्च डिझाइन अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशनकडून (आरडीएसओ) वेगाचे अंतरिम प्रमाणपत्रही मिळाले आहे. त्यात मेट्रोचे कमाल वेगाने परिचालन करण्याची मंजुरी मिळाली आहे. आता फक्त सुरक्षा चाचणी शिल्लक असून लवकरच ही सेवा सुरू करण्यात येईल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे. 

सिडकोकडून नवी मुंबईतील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने नवी मुंबई मेट्रो प्रकल्पांतर्गत एकूण चार उन्नत (एलिव्हेटेड) मार्ग साकारण्यात येत आहेत. यातील बेलापूर ते पेंधर हा मार्ग क्रमांक एक असून तो ११ किमी लांबीचा आहे. या मार्गावर तळोजा येथे मेट्रोचे आगार आहे. भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयांतर्गत असणाऱ्या ‘आरडीएसओ’ यांच्याकडून देशातील विविध रेल्वे प्रणालींमध्ये प्रमाणीकरण आणि समन्वय साधण्याची जबाबदारी असते. आरडीएसओ यांच्याकडून या मार्गावर पेंधर ते सेंट्रल पार्क स्थानकांदरम्यानच्या ५.१४ किमीच्या अंतरावर मेट्रोची नुकतीच ऑसिलेशन चाचणी आणि इनर्जन्सी ब्रेक डिस्टन्स चाचणी घेण्यात आली असून ती यशस्वी ठरली आहे. प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने चाचपणी म्हणून ऑसिलेशन चाचणी अत्यंत महत्त्वाची ठरते.

या दरम्यान वेगवेगळ्या वजनाचा भार वाहून नेण्याची मेट्रोची क्षमता आणि इमर्जन्सी ब्रेक यांची चाचणी घेण्यात आली. तसेच सिडकोकडून रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग, विद्युतपुरवठा, मार्गिका इ. मेट्रोतील प्रणालींशी संबंधित कागदपत्रे, चाचणी प्रमाणपत्रे ‘आरडीएसओ’ला दिली असून त्याचीही पडताळणी करण्यात आली आहे.

या मार्गावर ‘आरडीएसओ’कडून आता कमाल वेगाने मेट्रोचे परिचालन करण्याकरिता प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यामुळे लवकरच या मार्गावरून प्रवासी वाहतूक सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

 यानंतर लवकरच मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) विभागाचे आयुक्त यांच्याकडून या मार्गाचे परीक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर रेल्वे मंडळाची अंतिम मंजुरी प्राप्त केल्यानंतर पेंधर ते सेंट्रल पार्क ही मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे.

मेट्रो मार्ग क्रमांक १ वर घेण्यात येणारी ऑसिलेशन चाचणी यशस्वी ठरली असून, ‘आरडीएसओ’कडून या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोचे कमाल वेगाने परिचालन करण्यासंदर्भातील प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. यामुळे प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या दिशेने मोठा टप्पा गाठण्यात आला आहे. आता प्रवासी वाहतूक कार्यान्वित करण्यासाठी रेल्वेच्या सुरक्षा विभागाच्या (सीसीआरएस’ मंजुरीची प्रतीक्षा आहे.

-डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rdso certificate metro construction in navi mumbai navi mumbai metro line 1 zws

Next Story
उरणमध्ये एनएमएमटी बस पास वितरण सुविधा देण्याची मागणी
ताज्या बातम्या